हजारो किलो मटण, मासळी फस्त

पिंपरी – व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याचा प्रारंभ सोमवारपासून (दि. 13) होत आहे. यानिमित्त शहरातील खवय्यांकडून सुमारे 95 टन मांसाहारावर ताव मारण्यात आला. तर हजारो लिटर दारू रिचविण्यात आली. त्यामुळे आषाढातील शेवटच्या दिवशी चिकन, मटन व माशांना मागणी वाढली होती.

पाच टन मासळी, 50 टन चिकन, 40 टन मटण फस्त करुन सामिष खवय्यांकडून आषाढाची “सांगता’ करण्यात आली. आषाढाच्या शेवटच्या दिवशी खवय्यांकडून मटण, मासळी, चिकनला मोठी मागणी होती. त्यामुळे शहरातील मटण, मासळी तसेच चिकन विक्री करणाऱ्या दुकानात खरेदीसाठी गर्दी झाली होती.
श्रावण महिन्यात सामिष पदार्थ वर्ज्य केले जातात. त्यामुळे सामिष खवय्यांकडून मटण, मासळी, चिकनला आषाढ महिन्यात मोठी मागणी असते. अनेक जण दसऱ्यानंतर सामिष पदार्थांचा आस्वाद घेतात. आषाढ महिन्याची सांगता अमावस्येला होते. आषाढ अमावस्येच्या दिवशी सामिष पदार्थावर ताव मारुन दुसऱ्या दिवसापासून सामिष पदार्थाचे सेवन वर्ज्य केले जाते. त्यामुळे आषाढ अमावस्येच्या दिवशी मटण, मासळी तसेच चिकनच्या मागणीत मोठी वाढ होते. आषाढ महिन्यातील शेवटच्या आठवडा असल्याने गेले चार दिवस मटण, मासळी, चिकनला खवय्यांकडून मोठी मागणी होती. शहराच्या विविध भागांतील मासळी, मटण, चिकनची विक्री करणाऱ्या दुकानांत शनिवारी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळपासून खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने मासळीला मोठी मागणी होती. सर्व प्रकारच्या मासळीच्या दरात किलोमागे पन्नास ते साठ रुपयांनी वाढ झाली होती.

—कोट—
आषाढाच्या शेवटच्या दिवशी मटणाला चांगली मागणी होती. अमावस्या दुपारी साडे तीन वाजेपर्यंत असल्याने अनेकांनी सकाळीच शहरातील विविध मटण विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये गर्दी केली होती. मटणाचा भाव प्रतिकिलो 500 रुपयांवर पोहचला होता. तर आठवडाभर चिकनच्या मागणीत वाढ झाली होती. हॉटेल व्यावसायिक तसेच किरकोळ ग्राहकांकडून चिकनला चांगली मागणी होती.
– युसुफ कुरेशी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड मटण विक्री असोसिएशन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)