हक्‍काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची “व्रजमूठ’

बारामती, इंदापुरातील शेतकऱ्यांकडून “नीरा डावा कालवा संघर्ष समिती’ची स्थापना

बारामती – नीरा डावा कालव्याचे बारामती व इंदापूर तालुक्‍याचे पाणी कमी करण्याच्या निर्णयाला तालुक्‍यातील शेतकऱ्यांसह सर्व पक्षीय नेत्यांनीही रविवार (दि. 16) तीव्र विरोध करीत हक्‍काचे पाणी न्याय पद्धतीने मिळायला हवे, या मागणीसाठी विविध मार्गांनी आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे नीरा डावा कालव्याचे पाणी पेटणार अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, या बैठकीत “नीरा डावा कालवा संघर्ष समिती’ची स्थापना करण्यात आली आहे.

आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून गुरुवारी (ता. 20) तालुक्‍यातील हजारो शेतकरी तहसील कचेरीसमोर शांततामय मार्गाने निदर्शने करणार असून या वेळी तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. नीरा देवघर धरणातील नीरा डावा कालव्याच्या कार्यक्षेत्रावरील लाभधारकांचे त्यांच्या हक्‍काचे पाणी मिळेच पाहिजे अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांसह उपस्थितांनी घेतली. दरम्यान, वसंतराव घनवट, दीपक पांढरे व उद्धव मोरे या तीन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची तांत्रिक समिती या संदर्भात तीन दिवसांत अभ्यास करून कच्ची माहिती बारामती व इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना देणार आहेत. त्यांच्या माहितीच्या आधारे राज्य शासनासह न्यायालय किंवा महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडे दाद मागण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाविरोधात लढा उभारण्यासाठी अभ्यास करुन दाद मागण्यासह प्रसंगी न्यायालयातही जाण्याचा आग्रह शेतकऱ्यांनी धरला.

सतीश काकडे, राजेंद्र ढवाण, मदनराव देवकाते, कुलभूषण कोकरे, बाबूराव चव्हाण, अँड. राजेंद्र काळे, अमरसिंह जगताप, अविनाश देवकाते, अविनाश गोफणे, ऍड. नितीन कदम, बाळासाहेब गवारे, भारत गावडे, बाळासाहेब वाबळे, राहुल तावरे, रामदास आटोळे, सुरेश खलाटे, संपतराव देवकाते, भीमराव भोसले, रविराज तावरे यांच्यासह अनेक मान्यवर
उपस्थित होते.

नीरा देवघर धरणातील बारामती इंदापूर व पुरंदर तालुक्‍याच्या वाट्याचे हक्‍काचे पाणी आम्हाला समान न्याय वाटप पद्धतीने मिळायला हवे, या एकाच मागणीवर पुढील सर्व आंदोलन होईल, असेही या वेळी जाहीर केले गेले.

आंदोलन केवळ शेतकऱ्यांसाठीच
नीरा डावा कालव्यातील हक्‍काच्या पाण्यासाठी हे आंदोलन शेतकऱ्यांना नजरेसमोर ठेवून केले जाणार आहे, यात राजकारण किंवा पक्षाचा काहीही भाग नाही, असे कुलभूषण कोकरे व शिवसेना जिल्हा प्रमुख ऍड. राजेंद्र काळे यांनी स्पष्ट केले.

वरंधा घाटानजीक असलेल्या गावातून दरवर्षी पावसाळ्यातून वाहून जाणारे पाणी अडीच कि.मी. लांबीचा बोगदा करुन भाटघरमध्ये आणले, तर 13 टीएमसी पाणी अतिरिक्‍त मिळू शकते, याचाही विचार करण्याचे आवाहन शासनाला करणार आहे. तसेच ठरलेल्या आंदोलनामध्ये राजकारणाचा काही संबंध नाही.
– ऍड. राजेंद्र काळे, जिल्हा प्रमुख, शिवसेना

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here