हक्‍कसोडपत्रानंतर वारस नोंद

एक दिवस नवनियुक्‍त तलाठी भाऊसाहेबांनी मंडल अधिकाऱ्यांना विचारणा केली की, समजा, शंकरराव नावाचा खातेदार मयत झाला. त्याला वारस म्हणून त्याची पत्नी पार्वती, तीन मुले- राजेंद्र, विजय आणि अनिल तसेच दोन मुली- अलका आणि सुलोचना यांची नावे दाखल झाली. काही दिवसांनंतर अलका व सुलोचना यांनी भावांच्या हक्‍कात हक्‍कसोडपत्र करून दिले. कालांतराने पार्वती मयत झाली. आता वारस नोंद करताना अलका व सुलोचना यांची नावे पुन्हा पार्वतीचे वारस म्हणून दाखल करायची का?

मंडल अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, हक्‍कसोडपत्र म्हणजे कोणत्याही एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने, सहहिस्सेदाराने, त्याचा, त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवरील, स्वत:च्या हिश्‍श्‍याचा वैयक्‍तिक हक्‍क, त्याच एकत्र कुटुंबाच्या सदस्याच्या लाभात, स्वेच्छेने आणि कायमस्वरूपी सोडून दिल्याबाबत नोंदणीकृत दस्त म्हणजे हक्‍कसोडपत्र. एकत्र कुटुंबाचा कोणताही स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार फक्‍त वारसहक्‍काने मिळालेल्या किंवा मिळू शकणाऱ्या एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्वत:च्या हिश्‍श्‍याच्या मिळकतीपुरते हक्‍कसोडपत्र, त्याच एकत्र कुटुंबाच्या स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात करू शकतो.

आता तुमच्या उदाहरणाबाबत खुलासा असा की, मयत शंकररावांच्या नावावर गावात एकच शेतजमीन होती. ते मयत झाल्यानंतर त्यांचे वारस म्हणून त्यांची पत्नी पार्वती, तीन मुले- राजेंद्र, विजय आणि अनिल तसेच दोन मुली- अलका आणि सुलोचना यांची नावे दाखल झाली. काही दिवसांनंतर अलका व सुलोचना यांनी भावांच्या हक्‍कात हक्‍कसोडपत्र करून दिले. कालांतराने पार्वती मयत झाली. आता वारस नोंद करताना पार्वतीचे वारस म्हणून राजेंद्र, विजय आणि अनिल यांची नावे दाखल करावीत आणि अलका आणि सुलोचना या दोन वारसांनी राजेंद्र, विजय आणि अनिल या भावांच्यात हक्‍कात हक्‍कसोडपत्र करून दिले आहे त्याची नोंद फेरफार क्रमांक अन्वये नोंदविलेली आहे, असे नमूद करावे.

आता दुसरे उदाहरण- मयत शंकररावांच्या नावावर गावात तीन शेतजमिनी, एक घर आणि एक फार्महाऊस होते. ते मयत झाल्यानंतर त्यांच्या उपरोक्‍त पाच मिळकतींना त्यांचे वारस म्हणून त्यांची पत्नी पार्वती, तीन मुले- राजेंद्र, विजय आणि अनिल तसेच दोन मुली- अलका आणि सुलोचना यांची नावे दाखल झाली. काही दिवसांनंतर अलका व सुलोचना यांनी भावांच्यार हक्‍कात हक्‍कसोडपत्र करून दिले. या हक्‍कसोडपत्राची नोंद करताना, अलका व सुलोचना यांनी उपरोक्‍त कोणकोणत्या मिळकतींवरील हक्‍क सोडला आहे, याची सविस्तर नोंद घ्यावी. जरूर तर ज्या मिळकतींवरील हक्‍क सोडलेला नाही त्याबाबत स्पष्टपणे नमूद करावे. कालांतराने पार्वती मयत झाली. आता वारस नोंद करताना पार्वतीचे वारस म्हणून राजेंद्र, विजय आणि अनिल यांची नावे दाखल करावीत आणि अलका आणि सुलोचना या दोन वारसांनी राजेंद्र, विजय आणि अनिल या भावांच्या हक्‍कात या मिळकतींवरील हक्‍कसोडपत्र करून दिले आहे, त्याची नोंद फेरफार क्रमांक अन्वये नोंदविलेली आहे. परंतु या मिळकतीबाबत अलका आणि सुलोचना त्यांनी हक्‍कसोडपत्र करून दिलेले नाही. त्यामुळे हक्‍कसोडपत्र करून न दिलेल्या या मिळकतीवर राजेंद्र, विजय आणि अनिल तसेच अलका आणि सुलोचना यांचे नाव पार्वतीचे वारस म्हणून दाखल केले आहे असे नमूद करावे.तलाठी भाऊसाहेबांच्या प्रश्‍नाला अशा प्रकारे समाधानकारक उत्तर मिळाले.
(संदर्भ : मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882; मुंबई मुद्रांक कायदा 1958 ; हिंदू वारसा कायदा 1956 आणि 2005; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 149, 150.)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)