हक्काचे पैसे मिळणे झाले कठिण

निखिल गायकवाड

येरवडा – सध्या जवळपास सर्वच एटीएमच्या बाबतीत पैसे मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. विविध बॅंकाची हाकेच्या अंतरावर एटीएम सेंटर असूनही सर्वच ठिकाणी खडखडाट असल्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय ज्याठिकाणी पैसे उपलब्ध आहेत त्या बॅंकेचे एटीएम कार्ड नसल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे सर्व सामान्यांना त्यांच्या खात्यावरील हक्काचे पैसे मिळणे कठिण झाले आहे.
येरवड्यासह, विश्रांतवाडी, कल्याणीनगर, विमाननगर, धानोरी, लोहगावसह जवळपास सर्वच एटीएम सेंटरमध्ये पैसे उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बॅंका पैसे संपल्यानंतर पुन्हा लवकर पैसे एटीएम सेंटरमध्ये उपलब्ध करीत नाहीत. या अपुऱ्या पुरवठ्यामुळे बॅंकाचे व शासनाचे यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते.
विविध बॅंकांनी नोटाबंदीनंतर सर्रास आँनलाईन पैसे वापरण्याबाबत नागरिकांना सुचविले आहे. सरकार देखिल सामान्य नागरिकांचा विचार न करता अशा मनमानी योजना राबवित आहे. मात्र यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आवश्‍यक गरजेच्या वेळी पैसे उपलब्ध होत नाहीत. पेटीएम तसेच ऑनलाईन पैसे व्यवहार करणे देखिल कठिण आहे. नोटाबंदीसह एटीएममधील पैशांच्या खडखडामुळे राजकीय विरोधी पक्षांनी आंदोलने केली. मात्र पूर्ण सत्तेतील भाजपा याकडे दुर्लक्ष करीत असून परिस्थिति दिवसेंदिवस अधिकच बकिट होत चाललेली आहे. या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एटीएममधील पैसे उपलब्ध करून या गंभीर समस्येवर त्वरित उपाययोजनेची मागणी नागरिक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)