हक्काचे पाणी द्या, त्यानंतर मराठवाड्याला न्या

आमदार दत्तात्रय भरणे : पळसदेव येथील आंदोलनात बोगद्याचे काम बंद पाडण्याचा सरकारला इशारा

पळसदेव- इंदापूर तालुक्‍यातील हक्काच्या पाण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे प्रपंच उधवस्त होण्यापासून वाचविणे गरजेचे आहे. मराठवाड्याला इंदापुरकरांच्या हक्काचे पाणी देण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी मोठे जनआंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे, आमच्या हक्काचे पाणी द्यावे, त्यानंतरच उजनीतून पाणी मराठवाड्याला न्यावे, अन्यथा बोगद्याचे काम बंद पाडू, असा स्पष्ट इशारा आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिला आहे.
राजकारणात तुमची आणि आमची चूल वेगवेगळी आहे. परंतु, राजकारण बाजूला ठेवून तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्‍नासाठी एकत्रित यावे, असे आवाहनही माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना आमदार भरणे यांनी केले आहे.
निरा-भिमा स्थिरिकरण प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला पाणी देण्याच्या विरोधात पळसदेव (ता. इंदापूर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार भरणे बोलत होते. आंदोलनाचे नेतृत्त्व जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी केले. यावेळी बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, खरेदी-विक्री संघाचे सभापती अशोक चोरमले, अमोल भिसे, शशीकांत तरंगे, नगरसेवक श्रीधर बाब्रस, पोपट शिंदे, डी. एन. जगताप, प्रदीप काळे, अशोक घोगरे आदी उपस्थित होते.
आमदार भरणे म्हणाले की, खडकवासला कालव्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. पुण्यातील सगळे आमदार कालव्याच्या पाण्यासाठी एकवटले असून त्यांनी शहरातील पाणी कपात रद्द करण्यासाठी अनधिकृतपणे पंपहाऊसचे टाळे तोडून पाणी उपसले आहे. आपले माजी आमदार हर्षवर्धन पाटील हेही या समितीचे सदस्य आहेत. त्यांनी सोमवारी (दि. 26) होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या पाण्याबाबत आमच्याबरोबर आग्रही मागणी मांडावी.
आंदोलनाचे नेतृत्त्व करताना सभापती प्रवीण माने म्हणाले की, उजनीचे पाणी मराठवाड्याला देण्यासाठी करण्यात येणाऱ्या बोगद्याचे काम तातडीने बंद करण्यात यावे. अन्यथा जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल. कृष्णा खोऱ्यातील नद्यांचे पाणी उजनीत न आणता येथील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला पळविता येणार नाही. यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, मार्केट कमीटीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, मधुकर भरणे, डी.एन जगताप, जि. प. सद्‌स्य प्रताप पाटील, हनुमंत बंडगर, प्रदीप वाकसे, रामहरी चोपडे, जयदीप जाधव, कालीदास देवकर, लाला धवडे, दत्ता घोगरे, अनिल खोत,रमेश पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, उस्मानाबाद पाटबंधारे मंडळाचे उपअभियंता घनवट यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मेघराज कुचेकर यांनी सूत्रसंचालन केले.

  • राजकीय आरोप…
    राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना म्हंटले आहे की, हर्षवर्धन पाटील यांच्या तीन पिढ्यांची माहिती माझ्याकडे आहे. त्यांनी कारखान्यात, सहकार खात्यात केलेल्या घोटाळ्यांची सगळी माहिती माझ्याकडे आहे. ती उघड केल्यास यांना तालुक्‍यात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले की, लोणावळा भागातून समुद्राला वाहून जाणारे सुमारे 17 टीएमसी पाणी हे भीमा पात्रात आणावे. भीमा नदीलगतच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे हे पाणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी आरक्षित करण्याचे प्रयत्न आमदार दतात्रेय भरणे यांनी करावेत.
  • मुख्यमंत्र्यांनी योजना बदलली…
    कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारने कायम दुष्काळी असलेल्या मराठवाड्याला पाणी देण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून कुंभी, कासारी, कोयना नदीतील पाणी उजनीत आणून मराठवाड्याला देण्याचा प्रकल्प चालू केला होता. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस सरकारने ही योजना बदलून नीरा नदीतून पाणी भीमा नदीत सोडून मराठवाड्याला देण्याची योजना नव्याने आखल्याने नीरा नदी कायम कोरडी असते त्यावर योजना आखून फडणवीस सरकार उजनी प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करीत असल्याची भावना इंदापूर, दौंड, माढा, करमाळा भागातील शेतकऱ्यांची झाल्याने या योजने विरोधात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)