श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षादलांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. या दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री हंदवाडा येथील काझीबाद जंगलात लष्कराच्या पेट्रोलिंग पार्टीवर हल्ला केला होता. त्यावेळी जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले होते. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी त्वरीत शोध मोहीम सुरू करण्यात आली. त्याचवेळी झालेल्या चकमकीत दोन्ही दहशतवादी ठार झाले होते. शोध मोहिमेदरम्यान त्यांचे मृतदेह आढळून आले.
तत्पूर्वी, जम्मू-काश्‍मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बुधवारी सांयकाळी नॅशनल कॉन्फरन्सच्या एका स्थानिक नेत्याच्या घरावर ग्रेनेड लॉंचरने हल्ला केला होता. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोहम्मद अश्रफ भट्ट यांच्या घरावर हा हल्ला करण्यात आला होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर त्रालमध्ये लष्कर आणि एसओजीच्या पथकाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून सुरक्षा पथकांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 27 मे रोजी दहशतवाद्यांनी पुलवामातील काकपोरा येथील लष्कराच्या कॅम्पवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता तर एक स्थानिक नागरिक गंभीर जखमी झाला होता. शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी दक्षिण काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यात लष्कराच्या एका कॅम्पवर निशाणा साधला होता. त्यानंतर दक्षिण काश्‍मीरमध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला आणि विविध ठिकाणी शोध मोहीम हाती घेण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)