हंगाम सुरू होण्याआधीच कलिंगड बाजारात

पिंपरी – हंगाम सुरु होण्याअगोदरच पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात कलिंगड दाखल झाले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना लवकरच कलिंगडाचा आस्वाद मिळत आहे. हवामान स्थिर असल्याने उत्पादनावरही तितकासा परिणाम होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा कलिंगडाची गोडी स्वस्तातच चाखायला मिळेल, असा अंदाज विक्रेते व्यक्त करत आहेत.

हमखास पैसे मिळवून देणारे पिक म्हणून कलिंगडाची ओळख आहे. वेळे आधी कलिंगड बाजारात दाखल झाल्यास चांगला भाव मिळेल या अपेक्षने यंदा कलिंगडाची लवकर लागवड करण्यात आली. त्यामुळे हिवाळ्यातच कलिंगड विक्री दाखल झाले आहेत. शहरात साधारणतः फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्‌यात कलिंगड दाखल होतात. मात्र, यंदा जानेवारी महिन्याच्या सुरवातीपासूनच कलिंगडाची चव शहरवासियांना चाखायला मिळत आहे. शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये किलोमागे 5 ते 13 रुपये किलो दर मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठेमध्येही किरण जातीच्या कलिंगडाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सध्या पिंपरी शहरातील बाजारात कलिंगड 25 ते 30 रुपये किलोने ग्राहकांना मिळत आहे. सध्या, कलिंगडाचे दर काही प्रमाणात वाढलेले असले तरी पुढील काही दिवसात कलिंगडाची आवक वाढल्यानंतर दर 20 रुपये प्रति किलो होतील, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात राज्याच्या विविध भागात चायनिज बीज वापरुन लागवड केलेल्या चायनिज कलिंगडालाही मोठी मागणी असते. चायनिज कलिंगडामध्ये शुगर किंग, सागर किंग, किरण, ब्लॉक बॉय यासारखी कलिंगडे असतात. मात्र सध्या केवळ किरण जातीच्याच कलिंगडाची आवक होत असून इतर कलिंगड बाजारात येण्यास आणखी अवकाश असल्याची माहिती फळ विक्रेत्यांनी दिली.

यावर्षी जानेवारी महिन्यापासूनच कलिंगडाची आवक सुरु झाली आहे. मात्र कलिंगडाचा हंगाम सुरु होण्यास आणखी एक महिना वेळ आहे. सध्या कलिंगडाची उपलब्धता कमी प्रमाणात असली तरी भाव त्या तुलनेत स्थिर आहेत. सध्या पिंपरी येथील बाजारपेठेत 25 ते 30 रुपये कलिंगडाचा दर मिळत आहे. आवक वाढल्यानंतर हा दर आणखी कमी होईल अशी शक्‍यता आहे.
– असिफ बागवान, विक्रेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)