हंगामपूर्व द्राक्षांची मार्केट यार्डात आवक सुरू

दोन दिवसात 2 ते अडीच टन माल बाजारात


गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 ते 30 टक्के जास्त भाव मिळतोय

पुणे – गोड-आंबट चवीची, हिरव्या-काळ्या रंगाची द्राक्षी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा हंगामपूर्व द्राक्षांची आवक मार्केट यार्डातील फळ विभागात सुरू झाली आहे. रविवार (दि. 11 नोव्हेंबर), सोमवार (दि. 12) मिळून दोन दिवस बाजारात सुमारे अडीच टन द्राक्षांची आवक झाली. शरद सिडलेसला (काळे द्राक्षी) घाऊक बाजारात प्रती चार किलोस दर्जानुसार चारशे ते पाचशे रुपये, तास-ए-गणेशला (पांढरे द्राक्षी) प्रती आठ किलोस दर्जानुसार आठशे ते एक हजार रुपये भाव मिळाल्याची माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

द्राक्षांचा हंगाम डिसेंबर ते मार्च-एप्रिलपर्यंत असतो. मात्र, मागील काही वर्षात हंगामपूर्व द्राक्षांची आवक होत आहे. त्यानुसार बारामती, इंदापूर तालुक्‍यातून द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. सध्या ही आवक तुरळक असली, तरीही हळूहळी वाढत जाईल. डिसेंबरमध्ये हंगाम सुरू होईल. त्यावेळी आवकमध्ये मोठी वाढ होईल. याविषयी मोरे म्हणाले, रविवारपासून द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. मालाचा दर्जा उत्तम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत घाऊक बाजारात द्राक्षांना 20 ते 30 टक्के जास्त भाव मिळत आहे. शहर, उपनगर, पिंपरी आणि जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांकडून द्राक्षाला मागणी आहे. याबरोबरच कोकण, पर्यटन ठिकाणाहून मागणी आहे. तेथीही काही प्रमाणात माल जात आहे. सध्या बाजारात दाखल होणारे द्राक्षे आंबट गोड आहेत. काळ्या, हिरव्या रंगाची द्राक्षी बाजारात येत असून, दोन्हीही द्राक्षांना मागणी आहे. सध्या जिल्ह्यातील बारामती, इंदापूर भागातून द्राक्षी बाजारात येत आहेत. हंगाम सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातून द्राक्षांची आवक सुरू होईल. मात्र, यावर्षी दुष्काळाच्या झळा या पिकाला बसणार आहेत. पाण्याअभावी उत्पादन कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भाव तेजीत राहण्याची शक्‍यता आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)