स्वीस बॅंकेत भारतीयांचे पैसे 50 टक्‍क्‍यांनी वाढले

नवी दिल्ली – स्वीस बॅंकेमध्ये भारतीयांनी दडवून ठेवलेले पैसे 2017 मध्ये 50 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. ही रक्कम आता 1.01 अब्ज सीएचएफ (7 हजार कोटी रुपये) इतकी झाली आहे. स्वीस बॅंकेतल्या काळ्या पैशाविरोधात भारत सरकारच्या कारवाईच्या भीतीने गेल्या तीन वर्षांमध्ये ही रक्कम कमी होत होती. मात्र आता ती वाढली आहे.

स्वीस बॅंकेत पैसे ठेवणाऱ्या सर्व विदेशी खातेधारकांच्या पैशांमध्येही 3 टक्‍क्‍यांनी, 1.46 ट्रिलीयन किंवा 100 लाख कोटी रुपयांची वाढ 2017 मध्ये झाली आहे. स्वीस नॅशनल बॅंक (एसएनबी) या अल्पाईन देशाच्या मध्यवर्ती बॅंकिंग यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत वार्षिक माहितीमध्ये ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बॅंक ऑफ स्वीत्झर्लंडमध्ये खातेदारांच्या माहितीबाबत कमालिची गोपनीयता बाळगली जात आहे. स्वीस बॅंकेमध्ये दडवून ठेवलेल्या कथित काळ्यापैशाची माहिती मिळवण्यासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याचवेळी स्वीस बॅंकेत भारतीयांनी ठेवलेल्या पैशात वाढ होण्याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

स्वीस बॅंकेत भारतीयांच्या पैशांमध्ये 2016 साली 45 टक्‍क्‍यांनी घट झाली होती. तेंव्हा भारतीयांचे पैसे 676 दशलक्ष सीएचएफ (सुमारे 4,500 कोटी रुपये) इतके कमी झाले होते. युरोपिय देशांनी ही माहिती 1987 पासून प्रसिद्ध करायला सुरुवात केल्यापासून एका वर्षातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी घट होती.

स्वीस नॅशनल बॅंक (एसएनबी)च्या माहितीनुसार 2017 मध्ये भारतीय खातेदारांनी स्वतः थेट स्वीस बॅंकेत ठेवलेली एकूण रक्कम वाढून 999 दशलक्ष स्वीस फ्रॅंक (6,891 कोटी रुपये) इतकी होती. तर याच काळात मालमत्तांचे विश्‍वस्त आणि व्यवस्थापकांकरवी ठेवलीली रक्कम 16.2 दशलक्ष सीएचएफ (112 कोटी रुपये) पर्यंत वाढली होती. ही आकडेवारी 2016 च्या अखेरीस अनुक्रमे 664.8 दशलक्ष सीएचएफ आणि 11 दशलक्ष सीएचएफ इतकी होती.

ताज्या आकडेवारीनुसार 2017 च्या अखेरीस स्वीस बॅंकेतील भारतीयांच्या रकमेत 464 दशलक्ष सीएचएफ (3,200 कोटी रुपये) इतक्‍या ठेवी, 125 दशलक्ष सीएचएफ (1,050 कोटी रुपये) अन्य बॅंकांच्या माध्यमातून आणि 383 दशलक्ष सीएचएफ (2,640 कोटी रुपये) इतके तारण आणि अन्य दायित्वाच्या स्वरुपात आहेत. या तिन्ही स्वरुपात ठेवलेल्या रकमेमध्ये मोठी वाढ झाली आहे.

विश्‍वस्तांच्या माध्यमातून ठेवलेली रक्कम 2007 मध्ये काही अब्ज होती. मात्र कारवाईच्या भीतीपोटी त्यामध्ये सातत्याने घट होत राहिली. स्वीस बॅंकेत भारतीयांचे पैसे 2006 च्या अखेरीस सर्वाधिक म्हणजे 6.5 अब्ज सीएचएफ (23 हजार कोटी रुपये) इतके होते. मात्र कारवाईच्या भीतीने दशकभरात ही रक्कम कमी होत होत एकदशांश इतकीच राहिली. यादरम्यान केवळ तिसऱ्यांदा या रकमेत वाढ नोंदवली गेली आहे. 2011 मध्ये 12 टक्के, 2013 मध्ये 43 टक्के आणि 2017 मध्ये 50.2 टक्के इतकी वाढ झाली. 2004 पासून या रकमेत 56 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)