स्वीट होम इज बेटर

गेल्या दहा वर्षांत जमिनीचे, घराचे भाव गगनाला भिडले आहेत. त्या तुलनेत घराचा किराया किंवा भाडे कमीच राहिलेले दिसून येते. असे असले तरी घर विकत घेणे ही गोष्ट कधीही व्यवहार्य ठरू शकते तर भाड्याने राहणे हे परिस्थिती ओळखून घेतलेला “स्मार्ट” निर्णय म्हणावा लागेल.

प्रत्येकाचे स्वत:चे घर असावे, असे स्वप्न असते. त्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो, पण अनेक जण घराच्या किमती पाहून आपले प्रयत्न थांबवतात आणि किरायाच्या घरात राहणे पसंत करतात. घर विकत घेणे किंवा भाड्याने राहणे हा निर्णय प्रत्येकासाठी वेगळा ठरतो. डेव्हलपर्सकडून दिल्या जाणाऱ्या सवलती, बॅंकांचे घटलेले व्याजदर, गुंतवणूक या बाबींचा विचार केला तर घर विकत घेण्याचा निर्णय उपयुक्त ठरू शकतो, तर दुसरीकडे नोकरी आणि वेतनाबाबतची अनिश्चितता, सतत होणारी बदली आणि परिस्थिती यामुळे किराया देऊन घरात राहण्यासाठी काही जण पसंती देतात. आपण पुढील काही मुद्‌द्‌यावरून कोणत्या निष्कर्षाप्रत पोचतो ते पाहूया.

भाड्याने राहण्याची कारणे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लवचिकता: ज्या सोसायटीत, भागात, कॉलनीत किंवा शहरात राहण्यास परवडते, तेथे आपण भाड्याच्या घरात राहून आपल्या करिअरची सुरुवात करतो. एखादेवेळी अमूक ठिकाणी राहणे परवडत नसेल किंवा तेथील वातावरण खराब असेल तर आपण तत्काळ अन्य ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतो. भाड्याच्या घरामुळे निर्णय घेण्यात लवचिकता असल्याने काही जण त्याला प्राधान्य देतात.

नोकरीची अनिश्चितता

नोकरीबाबत खात्री नसेल तर अनेक जण भाड्याने राहण्यास पसंत करतात. भविष्यात अन्य ठिकाणी जाण्याच्या संधी उपलब्ध असेल तर संबंधित व्यक्ती घर विकत घेण्याचा विचार करत नाही. चांगले शहर किंवा जॉब निवडूनच तो घर विकत घेण्याचा विचार करतो, तोपर्यंत किरायाच्या घरात राहण्यास सोयीचे समजतो. नोकरीतून समाधान मिळत नसेल किंवा चांगले उत्पन्न नसेल तर ती सोडून अन्य चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. अशा वेळी घर विकत घेण्यापेक्षा चांगली नोकरी पाहण्यास प्राधान्य देतात.

अनिश्चित उत्पन्न

नोकरीप्रमाणेच उत्पन्नात सातत्य नसल्यास घर विकत घेण्याचा निर्णय लांबणीवरच टाकलेला बरा. एखादी व्यक्ती स्वत:चा उद्योगव्यवसाय असेल तर त्याचे उत्पन्न निश्चित नसते. अशा वेळी घर विकत घेण्याचा निर्णय घेण्यास तो पुढे धजत नाही. अशा वेळी बॅंकाही कर्ज देण्यास मागेपुढे पाहतात.

खराब पत

बाजारात खराब पत असेल तर नोकरी, उत्पन्न आणि कर्ज मिळण्यास अडचणी येतात. बॅंकसुद्धा कर्जदाराची पत पाहूनच कर्ज देतात. उत्पन्न, कुटुंबाची स्थावर मालमत्ता आदी बाबी तपासूनच पुढे जाते. अशा वेळी आर्थिक पतबाबत बॅंक समाधानी नसेल तर, कर्ज मिळण्यास अडचणी येतात.

घर घेण्यासाठी वाटाघाटी करणे

सध्या घर विकत घेणाऱ्या ग्राहकाचे राज्य आहे. कारण बिल्डर्स किंवा विकासकाला गुंतवलेले पैसे बाहेर काढण्यासाठी घर, फ्लॅट विकले जाणे अतिशय गरजेचे होऊन बसले आहे. अशा स्थितीत ग्राहक आपल्याला हव्या त्या किमतीत घर देण्यासाठी बिल्डर्सशी वाटाघाटी करू शकतो. चांगल्या सोसायटीत, चांगल्या कॉलनीत मोठ-मोठे प्रकल्प उभे राहत असून तेथे आपण आपल्या अटींवर बिल्डरला घर देण्यास भाग पाडू शकतो. त्याचबरोबर बॅंकांनीही व्याजदर घटविले असून त्याचाही फायदा उचलू शकतो. पूर्वी कर्जमंजुरीसाठी अनेक महिने लागत असत. आताच्या वाढत्या स्पर्धेमुळे बॅंकांचे प्रतिनिधी घरी येऊन कर्जमंजुरीची प्रक्रिया पूर्ण करतात. तसेच इएमआयमध्येही वाटाघाटी करण्यास ग्राहकाला संधी मिळते. आपल्यालाही कमी व्याजदरात अधिकाधिक कर्ज घेऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकतो.

गुंतवणूक मूल्य

भाड्यापोटी देण्यात येणाऱ्या रकमेचा कोणताच परतावा मिळत नाही. उलट मालक श्रीमंत होत जातो. याउलट कर्ज घेऊन आपण घर घेतले तर ग्राहक घराचा मालक होऊ शकतो. किराया आणि इएमआयमध्ये आजकाल फारसा फरक न राहिल्याने किराया देऊन राहण्यापेक्षा इएमआय भरून राहिलेले कधीही उत्तमच. त्याचबरोबर घर ही मोठी आणि स्थावर गुंतवणूक असल्याने आपल्याला कायम आधार देणारी बाब ठरते. याशिवाय गृहकर्जामुळे प्राप्तीकरातही मोठी सवलत मिळते. त्याचाही आपण फायदा घेतला पाहिजे.

नात्यांची बांधणी होत नाही

किरायाच्या घरात राहात असताना तेथे निर्माण होणारे नाते, ओळखी या कायमच राहतील, असे नाही. दर तीन वर्षाला घर बदलावे लागत असल्याने आपले कोणाशीच चांगले संबंध प्रस्थापित होत नाहीत. मुलांनाही वारंवार मित्र बदलावे लागतात. जर आपले मालकीचे घर असले तर दीर्घकाळासाठी मुलांना चांगले मित्र मिळतात, सोसायटीत नाते निर्माण होते, एकच शाळा राहिल्याने मुलांनाही आत्मियता वाढीस लागते. अशा अनेक गोष्टींमुळे स्वत:चे घर असणे हा एकमेव उपाय आहे.

सुरक्षितता आणि मालकी

साहजिकच स्वत:च्या मालकीचे घर असणे ही वेगळीच समाधान देणारी बाब असते. दुसऱ्याच्या घरात राहताना वाटणारी असुरक्षितता ही आपल्या करिअरवर परिणाम घडविणारी तसेच आर्थिक गणित बिघडवणारी ठरू शकते. त्यामुळे आर्थिक पाठबळ देणारे स्वत:च्या घरात राहण्याचे समाधान अन्य कशातही नाही. थोडीफार अडचण सहन करून घर विकत घेण्याचे धाडस दाखविले तर भविष्यात तो सर्वोत्तम निर्णय ठरू शकतो.

– शैलेश धारकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)