‘स्वीकृत’ निवड निर्विघ्न!

राष्ट्रवादीचे भोईर, वाबळे : भाजपकडून थोरात, नायर, शेडगे यांना संधी
पिंपरी, (प्रतिनिधी) – सत्ताधारी भाजपमधील पक्षांतर्गत वाद, सदस्यांच्या निवडीवरुन झालेले आरोप-प्रत्यारोप, महापालिका आयुक्‍तांना पाठवलेली नोटीस या घडामोडीनंतर अखेर शुक्रवारी सर्वसाधारण सभेमध्ये माऊली थोरात, बाबू नायर आणि मोरेश्‍वर शेंडगे यांची स्वीकृत सदस्यपदी घोषणा करण्यात आली. तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून संजय वाबळे आणि भाऊसाहेब भोईर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. स्वीकृत सदस्य निवड निर्विघ्न पार पडल्याने सत्ताधारी भाजपने सुटकेचा श्‍वास सोडला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विषय पत्रिकेवर स्वीकृत सदस्यनिवडीचा विषय होता. पिंपरी महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी दि. 9 मे रोजी अर्ज दाखल करण्यात आले होते. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे, तर भाजपकडून माऊली थोरात, बाबू नायर आणि मोरेश्वर शेडगे यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या निवडीची घोषणा महापौर नितीन काळजे यांनी केली.

गेल्या आठवड्यात स्वीकृत सदस्यनिवडीवरुन भाजपमध्ये राडा झाला होता. त्यामुळे भाजप स्वीकृतची नावे बदलणार असल्याची चर्चा होती. बाबू नायर यांनी दाखल केलेल्या स्वयंसेवी संस्थेचे “ऑडिट’ झाले नसून, ते संस्थेचे विश्वस्त आहेत आणि माऊली थोरत यांचे घर अनधिकृत असल्यामुळे त्यांची स्वीकृतपदी निवड करू नये यासाठी “आरपीआय’च्या कार्यकर्त्याने पालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यामुळे या निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु, नावामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे 77, राष्ट्रवादीचे 36, शिवसेना 9, अपक्ष 5 आणि मनसे 1 असे बलाबल आहे. महापालिकेत 128 नगरसेवक निवडून येतात, तर पाच स्वीकृत सदस्यांची निवड करता येते. संख्याबळानुसार भाजपच्या तीन आणि राष्ट्रवादीच्या दोघांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)