स्वित्झर्लंड बाद फेरीत, मात्र कर्णधार लिचस्टीनर निलंबित

निझनी नोव्हगोरोड – सातत्यपूर्ण खेळ करणाऱ्या स्वित्झर्लंडने अखेरच्या गटसाखळी सामन्यात कोस्टा रिका संघाला बरोबरीत रोखताना ई गटातून दुसऱ्या क्रमांकाने फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीतील स्थान निश्‍चित केले. आता येत्या मंगळवारी सेंट पीटर्सबर्ग येथे होणाऱ्या उपउपान्त्यपूर्व लढतीत स्वित्झर्लंडसमोर स्वीडनचे आव्हान आहे.

परंतु स्वित्झर्लंडसाठी बाद फेरीत स्थान मिळविण्याची कामगिरी “गड आला पण सिंह गेला’ अशा स्वरूपाची झाली. कारण दुसरे यलो कार्ड मिळालेल्या कर्णधार लिचस्टीनर आणि फॅबियन स्कॉएर या प्रमुख बचावपटूंना निलंबनाची शिक्षा भोगायची असल्यामुळे स्वीडनविरुद्धच्या सामन्यात खेळता येणार नाही. कोस्टा रिकाच्या डॅनियल कॉलिन्ड्रेसला अवैध पद्धतीने रोखल्यामुळे लिचस्टीनरला 37व्या मिनिटाला यलो कार्ड दाखविण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ब्राझिलविरुद्ध पहिल्या गटसाखळी सामन्यात पहिले यलो कार्ड मिळविणाऱ्या लिचस्टीनवरचे हे दुसरे यलो कार्ड ठरले. उत्तरार्धात स्कॉएरबाबत याचीच पुनरावृत्ती झाली. आता या दोघांच्या गैरहजेरीत स्वीडनला पराभूत करण्याचे आव्हान स्वित्झर्लंडसमोर राहील.

वास्तविक पाहता 88व्या मिनिटाला डेनिस झकारियाच्या पासवर जोसेप डर्मिकने स्वित्झर्लंडला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली, तेव्हा तोपर्यंत 1-1 अशा बरोबरीत चाललेल्या सामन्याला पहिली कलाटणी मिळाली. परंतु विजयाची स्वप्ने पाहणाऱ्या स्वित्झर्लंडला काही मिनिटांनीच हादरा बसला. जादा वेळेतील तिसऱ्या मिनिटाला कोस्टा रिकाला मिळालेल्या पेनल्टी किकवर ब्रायन रुईझने मारलेला फटका स्वित्झर्लंडचा गोलरक्षक यान सॉमरने रोखला. परंतु त्या प्रयत्नात त्याने स्वयंगोल केला आणि स्वित्झर्लंडला 2-2 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

त्याआधी ब्लेरिम झेमैलीने 31व्या मिनिटाला ब्रील एम्बोलोच्या पासवर लक्ष्यवेध करताना स्वित्झर्लंडला 1-0 असे आघाडीवर नेले होते. मध्यंतराला स्वित्झर्लंडकडे 1-0 अशी आघाडी कायम राहिली होती. परंतु 56व्या मिनिटाला जोएल कॅम्पबेलच्या पासवर केन्डॉल वेस्टनने अप्रतिम हेडर लगावताना कोस्टा रिकाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली होती. कोस्टा रिकाचा फिफा विश्‍वचषकातील हा पहिलाच गोल ठरला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)