स्वावलंबनाचे धडे… 

अरुण गोखले 

कोणत्या आईला आपल्या मुलाला आपल्यापासून दूर पाठवायला आवडेल? पण काही वेळेला मुलाच्या भल्यासाठी असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. रतनच्या भल्यासाठी त्याला सातारच्या मिलिटरी स्कूलमध्ये शिकायला पाठवताना त्याच्या आईला तसा कठोर निर्णय घ्यावा लागला होता.
पण आज सकाळपासून मात्र आईला त्याची एकसारखी राहून राहून आठवण येत होती. तो कसा असेल, तिथल्या कडक शिस्तीला, एकटेपणाला, स्वावलंबी जीवनाला तो सरावला असेल का? त्याला ते स्वावलंबी जीवन जगताना काही त्रास तर होत नसेल ना? या आणि अशा विचारांनी आईला जराही चैन पडत नव्हते.
तोच पोस्टमनने पत्र टाकले. ते पत्र रतनचेच होते. आईने ओळखले, पत्र हातात घेतले, तातडीने फोडले आणि ती पत्र वाचू लागली.

-Ads-

प्रिय आईस, रतनचा नमस्कार….
आई! मी इथे खूप मजेत आहे. नव्या वातावरणाशी मी आता हळूहळू रुळू लागलो आहे. आई, इथले वातावरण फार शिस्तीचे, कडक आणि स्वावलंबी आहे. सारी कामे इथे ज्याची त्यालाच करावी लागतात. शिस्त पाळावी लागते. पण खरं सांगू का आई! त्यावेळी तू मला जे शिस्तीचे, स्वावलंबनाचे, स्वत:चे काम स्वत: करण्याचे धडे दिलेस. ते सारे इथे उपयोगी पडत आहेत. इथे रोज सकाळी लवकर उठावे लागते. अंथरुण आवरावे लागते, स्वत:चे कपडे स्वत: धुणे, ताटवाटी घासणे, केर काढणे, खोली आवरणे, रोजचा रोज अभ्यास पुरा करणे, इ. या आणि अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी इथे ज्याच्या त्यालाच कराव्या लागतात.

आई, ज्या मुलांना या गोष्टीची सवय नाही. त्यांना फार त्रास होतोय. हे पाहिल्यावर त्यावेळी तुझ्या कडक शिस्तीने, थोड्याशा धाकाने आणि प्रेमळ सल्ल्याने मी त्या सर्व गोष्टी शिकलो, त्याचा आज मला इथे उपयोग होतो आहे. आई, या माझ्या आनंदाच, सुखाच, सारं श्रेय हे केवळ तुलाच आहे. तुझा लाडका रतन.

ते पत्र वाचलं आणि आईच डोळे आनंदाश्रूंनीं भरून आले. आईच्या संस्काराचे मोल रतनला समजले होते. कोणीही केव्हाही दुसऱ्यावर अवलंबून न राहता, स्वत:च स्वत:ची कामे केली तर जीवनात कोणतीच अडचण सोडवताना मनाची कणखर अवस्था झालेली असते, हेच या धड्यातून रतन शिकला होता. स्वावलंबन हीच यशाची गुरुकिल्ली असते. मात्र, आपल्या एकुलत्या एका किंवा अगदी लाडक्‍या अपत्याला लहानाचे मोठे करताना पालकच ही गुरुकिल्ली विसरून जातात.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)