स्वारगेट ट्रान्सपोर्ट हबचे काम महामेट्रोकडे

मुख्यमंत्र्यांचे आदेश, सहा महिन्यात काम सुरु होणार

प्रभात वृत्तसेवा

पुणे – स्वारगेट येथे सुमारे 26 एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या इंटीग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब चे काम अखेर महामेट्रो करणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. हे काम पुढील सहा महिन्यात सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामेट्रोस दिले आहेत. या जागेवर मेट्रो, राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस, या तिन्ही सार्वजनिक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. सुमारे 26 एकर जागेत हे हब उभारले जाणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) त्या संदर्भातील मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार असून, एसटी आणि पीएमपीशी चर्चा केली जाणार आहे. तर महामेट्रोने या प्रकल्पासाठीच्या पहिल्या टप्प्यासाठी स्वारगेट चौकात महापालिकेच्या मालकीची असलेली सुमारे 4 एकर जागेची या पूर्वीच पालिकेकडे मागणी केलेली आहे.

पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील मेट्रोचे भुयारी स्टेशन स्वारगेट येथे प्रस्तावित आहे. स्वारगेटवरून राज्याच्या वेगवेगळ्या भागांत ये-जा करणाऱ्या एसटीची वर्दळ मोठ्या स्वरूपात आहे. शहरांतर्गत प्रवासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पीएमपीच्या बसचे स्वारगेट प्रमुख स्थानक आहे. त्यामुळे, भविष्यात नागरिकांना सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्या, यासाठी इंटिग्रेटेड हबची संकल्पना मांडण्यात आली आहे. या कामाला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या असून, आगामी सहा महिन्यांत त्याचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.पाच वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेंगलोरच्या धर्तीवर हा हब विकसित करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर कामासाठी महापालिका प्रशासनाने आराखडा तयार केला होता. त्यासाठी सुमारे 350 कोटींचा खर्च अपेक्षीत धरण्यात आला होता. तर दोन वर्षांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्यशासनाच्या माध्यमातून हा हब करण्यासाठी पुढाकार घेतला होता.मात्र, त्यानंतर हा प्रस्ताव बारगळला होता. काही महिन्यांपूर्वी महामेट्रोने पीएमपीचे डेपो विकसित करण्यास संमती दर्शविली होती. त्यावेळी हा हबही विकसित करण्याची तयारी महामेट्रोने दर्शविलेली होती. त्यानंतर या हबसाठी मागील वर्षी स्थापन झालेल्या एमएसआरडीसीने त्याचा प्राथमिक आराखडा तयार केला होता.

मेट्रो करणार नवीन आराखडा

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार, आता हे काम करण्यासाठी महामेट्रोस परवानगी दिल्याने या हबचा नवीन नव्याने आराखडा तयार करावा लागण्याची शक्‍यता आहे. या इंटिग्रेटेड हबसाठी एसटी, पीएमपी आणि महापालिकेची जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करून त्याचा संपूर्ण आराखडा तयार करण्याची जबाबदारी महामेट्रोकडे देण्यात आली आहे. एसटी आणि पीएमपीशी सविस्तर चर्चा करून, त्यांच्या सूचना घेण्यात येणार आहेत. त्यानुसार, स्वारगेटचा एकत्रित आराखडा तयार करण्यात येईल, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)