स्वारगेट चौक घेणार मोकळा श्‍वास

खाद्यपदार्थांचे स्टॉल हटविले : सोमवारी सर्व पथारी हटविणार
पुणे-  स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडीस कारणीभूत अनधिकृत तसेच महापालिकेने परवाना दिलेल्या अधिकृत स्टॉल व्यावसायिकांवरही पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू केली आहे. त्यांतर्गत स्वारगेट बसस्थानकाच्या बाजूला असलेले सर्व खाद्य पदार्थांचे स्टॉल महापालिकेकडून शनिवारी कारवाई करून काढण्यात आले. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी एका सिलेंडरला आग लागल्याची घटना घडली होती.

मात्र, वेळीच ती आटोक्‍यात आल्याने मोठी दुर्घटना टळली होती. त्या विरोधात स्वारगेट पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून महापालिकेकडूनही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच, असा प्रकार वर्दळीच्या ठिकाणी पुन्हा घडल्यास मोठी जिवीतहानी होण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन अतिक्रमण विभागाकडून यापुढे या चौकात कोणालाही खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करून दिला जाणार नसल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

-Ads-

महापालिकेकडून या ठिकाणी काही पथारी व्यावसायिकांना परवाने दिले आहेत. मात्र, फेरीवाला धोरणानुसार, रस्त्यावर खाद्यपदार्थ शिजविण्यास मनाई आहे. त्यानुसार, पालिकेकडून रस्त्यावर खाद्यपदार्थ बनविताना आढळल्यास सिलेंडर जप्त केले जातात. महापालिकेची ही कारवाई सुरू असतानाच, स्वारगेट स्थानकाच्या बाहेर गॅस सिलेंडर पेटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला असून पालिकाही गुन्हे दाखल करणार आहेत. त्यामुळे महापालिकेने या भागात असलेली वर्दळ आणि नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन शनिवारी सकाळपासून या ठिकाणी असलेले खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल काढले आहेत. या स्टॉलला महापालिकेची मान्यता असल्याने कारवाई करू नये, अशी मागणी या स्टॉलधारकांनी केली होती. मात्र, महापालिकेने न्यायालयाचे आदेश तसेच पथारी धोरणाचे कारण सांगत या सर्व पथारी हटविण्यात आल्या आहेत.

मेट्रोसाठी 42 स्टॉलचे सोमवारी स्थलांतर
चौकाच्या बाजूला असलेल्या पाणीपुरवठा विभागाची जागा मेट्रो प्रकल्पाच्या मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हबसाठी देण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी मेट्रोचे भुयारी स्टेशनही असणार आहे. या स्टेशनसाठी मेट्रोकडून शाफ्टचे काम सुरू करण्यात आले असून लवकरच भुयारी मार्गाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे महामेट्रोने सातारा रस्ता आणि सिंहगड रस्त्याच्या उड्डाणपुलापासूनच्या सर्व जागेची मागणी पालिकेकडे केली आहे.

त्यामुळे या दोन्ही ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांचे पुनर्वसन महापालिकेकडून लक्ष्मी नारायण चित्रपटगृहाच्या समोरील बाजूस असलेल्या रस्त्यावर केले जाणार आहे. त्यासाठी या भागात थांबणाऱ्या सर्व आरामबसला बंदी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. दरम्यान, या ठिकाणचे अधिकृत स्टॉल हटविण्यात येऊ नयेत म्हणून पथारी व्यावसायिकांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागास पत्र दिले असले तरी, पालिकेने त्यास नकार दिला असून ही कारवाई सोमवारपासून होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)