स्वारगेट चौकातील ग्रेडसेप्रेटर खुला

पुणे – शहरातील अत्यंत गर्दीच्या आणि सतत वाहतूक कोंडी होणाऱ्या स्वारगेट चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता बांधलेल्या ग्रेडसेप्रेटरचे कामही पूर्ण झाले आहे. शुक्रवारी हा ग्रेडसेप्रेटर वाहनचालकांसाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते फीत कापून खुला करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वारगेटच्या ग्रेडसेप्रेटरचे उद्‌घाटन करण्यात येणार होते. मात्र उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या अकस्मात मृत्यूमुळे हे उद्‌घाटन होणार नसल्याचे भाजपने गुरूवारी जाहीर केले. शुक्रवारी सकाळीच हा ग्रेडसेप्रेटर उद्‌घाटनाशिवाय खुला करण्यात येणार असल्याचे भाजपने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले होते. मात्र, प्रत्यक्षात या ग्रेडसेप्रेटरचे उद्‌घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते फीत कापून शुक्रवारी सकाळी करण्यात आले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थानिक नगरसेवक प्रवीण चोरबेले आणि कविता वैरागे, मुख्यअभियंता श्रीनिवास बोनाला आदी उपस्थित होते.
शहरातील सर्वाधिक वाहतुकीच्या असलेल्या स्वारगेट चौकातील वाहनांच्या कोंडीमुळे वाहनचालकांना अतिशय त्रास सहन करावा लागत होता. एकात्मिक रस्ते विकास महामंडळाच्यावतीने कै. केशवराव जेधे चौकात उड्डाणपूल आणि ग्रेडसेप्रेटरचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून करण्यात आले आहे. सातारा रस्त्यावरील एसटी बसस्थानक ते साई मंदिरपर्यंत छोटा उड्डाणपूल आणि त्यालाच जोडून हडपसरकडे जाणारा पूल अशा दोन पूलांचे काम याआधी पूर्ण झाले आहेत. हडपसर रस्त्यावरून धम्मविपश्‍यना केंद्रापर्यंत जाणाऱ्या ग्रेड सेप्रेटरचे काम पूर्ण झाले आहे. 445 मीटर लांब, 78 मीटर भूमिगत असा हा मार्ग आहे. याची रुंदी 7.50 मीटर उंची 5.5 मीटर आहे. या कामासाठी 20 कोटी रुपये खर्च आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)