महामेट्रोची महापालिकेकडे मागणी : लवकरच भुयारी मार्गाचे काम
पुणे – महामेट्रोकडून स्वारगेट येथील जागेत मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारले जाणार आहे. या कामासाठी या चौकातील शाहू महाराज बस स्थानकापासून ते सारसबागेकडे उड्डाणपूल संपेपर्यंतची जागा तातडीने मिळावी, अशी मागणी महामेट्रोकडून करण्यात आली आहे.
सातारा रस्त्याकडून येताना, चौकाच्या बाजूला असलेल्या पाणीपुरवठा विभागाची जागा मेट्रो प्रकल्पाच्या मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हबसाठी देण्यात आली आहे. तसेच, या ठिकाणी मेट्रोचे भुयारी स्टेशनही असणार आहेत. या स्टेशनसाठी मेट्रोकडून शाफ्टचे काम सुरू करण्यात आले असून लवकरच भुयारी मार्गाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे महामेट्रोने सातारा रस्ता आणि सिंहगड रस्त्याच्या उड्डाणपुलापासूनच्या सर्व जागेची मागणी पालिकेकडे केली आहे.
त्यामुळे या दोन्ही ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांचे पुनर्वसन महापालिकेकडून लक्ष्मी नारायण चित्रपटगृहाच्या समोरील बाजूस असलेल्या रस्त्यावर केले जाणार होते. मात्र, ऐन दिवाळीत महापालिकेने हे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याने या भागातील अधिकृत पथारी व्यावसायिकांनी त्यास विरोध केला होता. तसेच दिवाळीनंतर कारवाई करावी आणि ज्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार त्या ठिकाणी पाणी, ड्रेणेज तसेच वीजेची सोय द्यावी अशी मागणी केली होती.
ही मागणी लक्षात घेऊन हे स्थलांतराचे काम पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, दिवाळी संपून महिना होत आला तरी आता पालिकेकडून जागा दिली जात नसल्याचे महामेट्रोकडून दोन दिवसांपूर्वी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. तसेच शक्य तेवढ्या लवकर ही जागा द्यावी अशी मागणी केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
बचत गटाच्या इमारतीचीही मागणी
या चौकात असलेली महिला बचत गटाच्या इमारतीचीही मागणी महामेट्रोकडून करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या शिवाय, या ठिकाणचे काही बस थांबेही स्थलांतरील करावे लागणार असल्याने त्याबाबत नियोजन करण्यासाठी लवकरच बैठक घेतली जाणार असून याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे राव यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा