स्वायत्ततेमुळे दर्जेदार संशोधनांची दालने खुली

डॉ. नितीन करमळकर : पुणे विद्यापीठ, सिंबायोसिस आणि डी.वाय.पाटील विद्यापीठाला स्वायत्तेचा दर्जा
पुणे – विद्यापीठात जर सद्य स्थितीत बघायला गेलं तर संशोधनांमध्ये त्याच त्याच विषयांवरचे प्रबंध घेतले जातात. ज्याचा संशोधनाच्या दृष्टीकोनातून समाजाला, व्यवसायवाढीसाठी फारसा उपयोग होत नाही. ही स्वायत्तता एक आव्हान घेऊन आली आहे. ज्यामुळे दर्जेदार संशोधन करण्याची अनेक दालने यामुळेच खुली झाली असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्‍त केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबरच पुण्यातील सिंबायोसिस, डी.वाय.पाटील विद्यापीठांना स्वायत्तेचा दर्जा मिळाला असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून मंगळवारी रात्री उशीरा करण्यात आली. त्यानंतर दैनिक “प्रभात’ने याविषयी डॉ. करमळकर यांच्याशी “स्वायत्तता’ या विषयावर संवाद साधला.
यावेळी करमळकर म्हणाले, स्वायत्तता मिळाली म्हणजे विद्यापीठ पूर्णपणे स्वत:च्या मर्जीने चालणार अश्‍यातला भाग नाही. विद्यापीठ कायदा, उच्च शिक्षण विभागाकडून येणाऱ्या सूचना, राज्य शासनाच्या सूचना या असणारच आहे. मात्र, विद्यापीठाला जर एखादा नवा अभ्यासक्रम सुरू करायचा असेल, अभ्यासक्रम बदलायचा असेल, काही व्यावसायिकांच्या माध्यमातून काही संशोधन केंद्र उभारायची असतील तर त्यांना ते स्वातंत्र असेल. एकुणातच काही निर्णयांचे स्वातंत्र मिळाल्याने विद्यापीठात येत्या काळात अनेक प्रयोग, नव्या संकल्पना राबविणे शक्‍य होईल. यामुळे पारंपरिक चौकटीतील अभ्यासक्रमांबरोबरच नव्या वाटा शोधण्याचा मार्ग मोकळा होईल.
स्वायत्ततेची प्रक्रिया कशी राबवायची याबाबत मी आयआयटीकडे बघतो. त्यांच्याकडे एक स्वतंत्र मंडळ असते जे शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत हुशार, व्यवहार व शिक्षणाची, विज्ञानाची सांगड घालणारे असते. तसे मंडळ आपल्याकडेही स्थापन केले जाईल. आपल्याकडे तशी अनेक मंडळीही आहेत.
करमळकर पुढे म्हणाले, विद्यापीठाला स्वायत्तता मिळाल्याची माहिती समजली तेव्हा अनपेक्षित सुखद धक्का बसला. केंद्राकडून विद्यापीठाला अनोखी भेट मिळाली आहे. यापूर्वी केंद्राचे शिष्टमंडळाने विद्यापीठात येऊन माहिती घेतली होती. त्यांचे निकष विद्यापीठाने पूर्ण केल्याने स्वायत्तता मिळाली असावी.
या निर्णयामुळे विद्यापीठाला नवे अभ्यासक्रम, परीक्षेचे आयोजन, परदेशी प्राध्यापकांची भरती करता येणार आहे. यामुळे विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या शुल्कात कोणता फरक पडेल असे नाही उलट विद्यापीठ अनेक दृष्टीकोनातून आर्थिक स्वावलंबी होईल. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य सरकारच्या तिजोरीतून होणार आहे. फरक इतकाच सरकारच्या निधीबरोबरच विद्यापीठ स्वबळावर निधी उभारू शकणार आहे. त्यामुळे पैशावाचून कुठलेही काम थांबणार नाही, किंवा पैशांची वाट पाहावी लागणार नाही.

सिम्बायोसिस विद्यापीठाला पूर्ण स्वायत्तता मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. परदेशी शिक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. यापुर्वी युजीसीकडे शुल्लक गोष्टींची परवानगी घ्यावी लागत असे. स्वायत्तता मिळाल्याने शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यापीठाचा विस्तार करण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यापीठाला इतर राज्यांमध्ये कॅम्पस सुरू करण्याची मागणी होत होती. या स्वायत्ततेमुळे आता कॅम्पस सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
– विद्या येरवडेकर- प्रभारी कुलगुरू, सिंबायोसिस अभिमत विद्यापीठ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)