स्वामी : एक ग्रेट पुस्तक

मनिषा संदीप

हास्य जसे माणसाचा चेहरा सुंदर बनवतो तशी काही पुस्तके माणसाचे मन सुंदर बनवतात. आणि अशाच सुंदर मनाच्या पुस्तकप्रेमींना, “अस्मिता’च्या वाचकांना आज मी पुन्हा भेटते आहे. आज पुन्हा एकदा तुम्ही मला लिहिते केले आहे. पण आज का कोण जाणे लिहिताना मन उदास आणि अभिमान या संमिश्र भावनेने भरून आले आहे… कारण मी आज ज्यांच्याबद्दल लिहिणार आहे ते, सुवर्ण इतिहासातील एक मानाचे स्थान… श्रीमंत माधवराव पेशवे आणि त्यांच्या पतिव्रता पत्नी रमाबाई यांच्याविषयी…

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच माधवराव पेशवे बनले आणि राज्याचा कारभार पाहू लागले. तडफदार नेतृत्व, धाडसी, तसेच प्रेमळ माधवराव यांनी लवकरच जनतेच्या मनात घर केले पण हीच गोष्ट राघोबादादा आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांना सहन होईना आणि मग घरातच कटकारस्थान सुरू झाले. आनंदीबाई यांना दागदागिने, नटणे, मुरडणे सगळ्यांवर रूबाब दाखवणे याची आवड तर राघोबादादाला शानशौक, दासदासींची आवड… रमाबाई सुंदर, गुणी, प्रेमळ आणि लहान वयातही खूप समंजस.. रमाबाई आणि माधवराव यांचे एकमेकांवरील प्रेम अतिशय छान वाटते वाचायला… शनिवारवाड्याची भव्यदिव्यता वाचताना पुन्हा एकदा तिथे जाऊन पाहावेसे वाटले तर नवल नाही. थेऊरच्या गणपतीवर असलेली त्यांची श्रद्धा थक्‍क करणारी आहे. सगळे काही ठीक चाललेले असताना माधवरावांना झालेला आजार. त्यातून त्यांचे बरे न होणे… त्यानंतर खूपच लहान असलेल्या रमाबाई यांचे सती जाणे, असे प्रसंग अंगावर काटा आणतात. श्रीमंत माधवरावांसारख्या पेशव्यांचे अकाली जाणे खरे तर इतिहासाची खूप मोठी हानी आहे. मनात अभिमान आणि डोळ्यात पाणी घेऊन कादंबरी संपते. काही वेळ मन सुन्न होते…थेऊर येथे रमाबाई आणि माधवराव यांची समाधी आहे… “स्वामी’ या कादंबरीबद्दल खूप ऐकले होते पण वाचण्याचा योग आता आला. रणजित देसाई खूप मोठे लेखक आहेत. त्यांचे लिखाण अप्रतिम आहे, हे मी वेगळे सांगायची खरे तर गरज नाही. ज्यांनी कोणी स्वामी ही कादंबरी वाचली नसेल, त्यांनी नक्‍की वाचा. मला खूप आवडली तुम्हालाही आवडेल, अशी अपेक्षा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)