स्वाभिमानी पगडी

    संस्कार

 अरुण गोखले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बादशहा अकबर एक निष्णात गुणग्राहक आणि पारखी. त्याला गुणीजनांबद्दल मोठा आदर, त्याने आपला दरबार नऊ नररत्नांनी सुशोभित केला होता. थोर पराक्रमी आणि न्यायनिष्ठ अकबर बादशहाच्या दरबारात एके दिवशी एक नवल नावाचा भाट कवी आला. गुणांची कदर करणाऱ्या बादशहाने त्या शीघ्र कविराजाचे आपल्या दरबारात स्वागत केले. कविराजाने एक सुंदरसे स्तुतिगीत गातचं दरबारात प्रवेश केला. त्या गीताची सुरेल चाल. त्यातले चपखल बसवलेले बादशहाचे गुण वर्णन करणारे शब्द, प्रत्येक कडव्यातील नव्या कल्पना, उपमा आणि समर्पक शब्दातली ती बादशहाची स्तुती ऐकून केवळ बादशहाच नव्हे तर सारा दरबार प्रभावित झाला.

त्या कविराजाचे देखणे रूप, त्याचा डौल, भारदस्त आवाज, संगीताची अचूक जाण हे सर्व पाहून सर्वांच्याच मनात त्या कविराजाबद्दल एक आगळावेगळाच आदर निर्माण झाला. बादशहा तर त्याच्या काव्यावर बेहद्द खूष झाला. बादशहाने प्रधानास त्या कविराजाला शाल, श्रीफल आणि सहस्त्रसुवर्ण मुद्रांची थैली भेट देण्याची आज्ञा दिली. शहेनशहाच्या दरबारातील तो सन्मान स्वीकारण्यासाठी नवल कविराज पुढे झाला. त्याने तो सन्मान स्वीकारला. मात्र, कृतज्ञतापूर्वक खाली मान झुकवून बादशहाला मुजरा करण्यापूर्वी तो आपल्या डोक्‍यावरची पगडी काढायला विसरला नाही. त्याचे सर्वांना विलक्षण आश्‍चर्य वाटले. काहींना तर तो बादशहाचा अनादर केल्यासारखेही वाटले.

डोक्‍यावरची पगडी काढून ती काखेत घेत बादशहांना विनम्र अभिवादन करून परत मागे वळणाऱ्या कविराजाला थांबवीत बादशहा म्हणाला “”कविराज! आपल्या दर्जेदार काव्य, संगीत, स्वर आणि विनम्रता याने आम्ही फार प्रभावीत झालो. पण, आम्हाला अभिवादन करताना तुझ्या डोक्‍यावरची पगडी तू का काढलीस, ते सांगशील का?”
तेव्हा नवल कवी म्हणाला “”जहॉंपनाह! मी ती पगडी काढली. कारण ती पगडी स्वाभिमानी महाराणा प्रताप यांची आहे. त्याच्या प्रांतात गेलो असता माझ्या कवित्वावर खूष होऊन त्यांनी त्यांच्या डोक्‍यावरची पगडी माझ्या डोक्‍यावर घातली आहे.

स्वाभिमानी महाराणा प्रताप आजवर कुणा सत्तेपुढे, तख्तापुढे झुकले नाहीत. यापुढेही कधी ते झुकणार नाहीत. तेव्हा त्या स्वाभिमानी,पराक्रमी, शूर आणि धर्मनिष्ठ राजाचा आपल्या हातून अनावधानानेही अनादर होऊ नये. तो जसा कुणापुढे झुकत नाही, झुकणार नाही. त्याप्रमाणे त्याची पगडीही कुणापुढे झुकू नये, म्हणून मी तसे केले. महाराज! माझे मस्तक मी हजारदा झुकवेन, पण, क्षमा असावी, ही पगडी मात्र कधीही झुकणार नाही.’ ते तसे चोख उत्तर दिले आणि झटकन मागे वळून तो कविराज बादशहाच्या दरबारातून बाहेर पडला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)