स्वाभिमानी अखेर सत्तेतून बाहेर

पुणे- गेले साडे तीन वर्षापासून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. संघटनेच्या कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला,यावेळी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी दोन्ही सरकारशी यापुढील काळात आमचे कुठलेही संबंध राहणार नाहीत तसेच सगळ्याच राजकीय पक्षांशी समान अंतर ठेवून आगामी काळात शेतकरी चळवळ बळकट करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारिणीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राजू शेट्टी तसेच वस्त्रोद्योग महामंडळाचे रविकांत तुपकर तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गेले साडे तीन वर्षे सत्तेत सहभागी असून आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवू शकलो नाही याची खंत वाटते, शेती मालाची घट होत आहे त्याचबरोबर शेतकरी कर्जबाजारी व्हायला लागला आहे. शेतकऱ्यांची ही अवस्था होत असताना दुसरी कडे मात्र शेतीमाल आयात करुन शेतकऱ्यांना आणखी मारले जात आहे. गेले साडे तीन वर्षे आम्ही दोन्ही सरकारचा कारभार जवळून पाहिला शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्‍न सोडविण्याची मानसिकता या शासनाची दिसत नाही. भाजपाला मत द्या म्हणून आम्ही ज्यांच्याकडे मागणी केली त्यांच्या पुढे आता आम्हाला मान खाली घालावी लागत आहे. त्यामुळे आता या सरकारमध्ये राहणे शक्‍य नाही.असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, या सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची जाणीव झाल्यावर खुप वाईट वाटले.त्यामुळेच मे महिन्यात आम्ही आत्मक्‍लेश यात्रा काढली.या सरकारसाठी मते मागून आम्ही फसलो आहोत.हे ज्यावेळी लक्षात आले त्यावेळी थेट महात्मा फुले वाडा गाठला आणि तेथे जावून माफी मागितली.हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्‍न जाणून न घेता फक्त राजकारण करत आहे.आम्ही सत्तेतून बाहेर पडल्याने केंद्र किंवा राज्यातील सरकारला कुठलाही धोका नाही पण हे आम्ही जाणतो पण यापुढील काळात रस्त्यावर उतरुन आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्‍नासाठी लढा देणार आहोत.

शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे आणि स्वामिनाथन आयोगाने केलेल्या शिफारसी नुसार शेती मालाला उत्पादनाच्या दिड पट भाव मिळाला पाहिजे अशी आमची प्रमूख मागणी असून यापुढील काळात या मागणीसाठीच रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येणार आहे. आम्ही संघर्ष करणारी माणसे आहेत त्यामुळे परिणामांना आम्ही घाबरत नाही.

सत्तेत सहभागी असल्यामुळे राज्य शासनाच्यावतीने स्वाभीमानी शेतकरी संघटनेला दोन पदे देण्यात आली होती. त्यात सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्री पद तर रविकांत तुपकर यांना वस्त्रोद्योग महामंडळ अध्यक्षपद सोपविण्यात आले होते. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तुपकर यांनी आपण महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याच जाहीर केले. येत्या चार सप्टेंबर रोजी हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपविण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सुध्दा समवेत असणार आहेत. त्याचबरोबर महामंडळाच्यावतीने मिळालेले घर आणि गाडी आपण आजच सरकारच्या ताब्यात देणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)