“स्वाभिमानी’चा “किसन वीर’वर ठिय्या

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह सभासदांनी फिरविली पाठ
भुईंज – किसन वीर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची कोट्यवधींची ऊस बिले थकविल्याने सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किसन वीर कारखाना कार्यस्थळावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी कारखाना व्यवस्थापनाने 31 ऑगस्टपर्यंत ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, 31 ऑगस्टपर्यंत बिले जमा न झाल्याने संघटना पुन्हा 1 सप्टेबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिली.

वाई, खंडाळा, जावली, सातारा आणि कोरेगाव या पाच तालुक्‍यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसनवीर कारखान्याने 2017-18 या गळीत हंगामातील शेतकऱ्यांची ऊसाची कोट्यवधीची बिले थकविली आहेत. बिले मिळावीत यासाठी शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयाचेही उंबरठे झिजविले आहेत. याबाबत साखर आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतरही कारखान्याने शेतकऱ्यांना बिले दिलेली नाहीत. दरम्यान, डिसेंबर महिन्यानंतर गाळप झालेल्या ऊसाचे एक रुपायही बिल कारखान्याने काढले नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. काही शेतकऱ्यांना सोसायट्यांचे कर्ज भागविण्यासाठी 1700 रुपयांनी बिले देण्यात आली आहेत. मात्र त्यातूनही शेतकऱ्यांची कर्जे भागलेली नाहीत.

बिले न मिळाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी सोमवारी खासदार राजू शेट्टे यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली किसनवीर कारखान्यावर ठिय्या आंदोलन केले. सोमवारी सकाळी 11 वाजता आंदोलना सुरुवात झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कारखाना व्यवस्थापनाचा निषेध केला. तसेच शेतकऱ्यांची थकित बिले लवकरात लवकर जमा करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी किसनवीरचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले. दरम्यान, 31 ऑगस्टपर्यंत बिले जमा करणार असल्याचे लेखी आश्‍वासन बाबर यांनी शेतकरी संघटनेला दिले. लेखी आश्‍वासनानंतर संघटनेने आंदोलन मागे घेतले. यावेळी भुईंज पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह सभासदांची पाठ
थकित ऊसबिलापोटी सोमवारी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किसन वीर कारखान्यावर आंदोलन केले. मात्र, या आंदोलनात संघटनेचे 30 ते 40 कार्यकर्तेच सहभागी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनाकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह सभासदांनीही पाठ फिरविली. दरम्यान, शेतकऱ्यांनीच या आंदोलनाकडे पाठ फिरविल्यामुळे विरोधकांसह साखर आयुक्तांना न जुमानणारे किसनवीर कारखान्याचे व्यवस्थापन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला कितपत भीक घालणार याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)