स्वाभिमानी’कडून जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक : ऊस दर आंदोलनाचा भडका

संग्रहित फोटो
सांगली: जिल्ह्यात ऊसदराचा तोडगा निघाला नसताना साखर कारखान्यांनी गळीत हंगाम चालू केला असल्याने  ऊस आंदोलनाचा भडका उडाला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली.   जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मात्र अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याचा खुलासा करण्यात आला आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या घटनेची जबाबदारी स्विकारली असून ऊसदराच्या प्रश्नावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होऊ लागलेल्या कोंडीच्या पार्श्वभूमीवरच आम्हाला आक्रमक व्हावे लागत आहे , असे स्वाभिमानीच्या म्हणणे आहे.
 गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह, रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेने एफआरपी  + 200 तसेच साडे तीन हजार रुपये पहिला हप्ता देण्याची मागणी केली आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 27 ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत एफआरपी +  200 रूपये दर देण्याची मागणी केली आहे, दर न दिल्यास कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा ‘स्वाभिमानी’ ने दिला आहे, याबाबत स्वाभिमानीने जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवर धडक रॅली काढून कारखाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते, मात्र साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये केवळ एक काच फुटली आहे , या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी विजय काळम – पाटील  यांनी  चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान सांगली – मिरज  रस्त्याकडील बाजूस असलेल्या अंधाराचा गैरफायदा घेऊन अज्ञाताने दगडफेक केली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी सरकारने मध्यस्थी करावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच धर्तीवर सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनीही तोडगा निघेपर्यंत धुराडे बंद ठेवावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी विजय काळम – पाटील यांच्याकडे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी ऊसाला 3500 रुपये भाव देण्याची मागणी केली होती . जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा निघेपर्यंत कारखाने बंद ठेवावेत असे आवाहन केले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशीच जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)