स्वाधीन क्षत्रिय निवृत्तीनंतरही सरकारी बंगल्यातच!

मुंबई : मुंबई-ठाण्यात मालकी हक्काची घरे असूनही राज्याच्या आजी-माजी अधिकाऱ्यांना सरकारी निवासस्थान सोडण्याची काही इच्छा होत नसल्याचे दिसत आहे. कारण राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनादेखील निवृत्तीनंतर सरकारी निवासस्थानात राहण्याचा मोह आवरता येत नसल्याचे पहायला मिळत आहे.
वांद्रे आणि नेरुळमध्ये स्वाधीन क्षत्रिय यांचे स्वत:चे हक्‍काचे घर असूनही अद्याप शासकीय निवासस्थान सोडले नाही. शिवाय, त्यांनी त्याबदल्यात आणखी एका नवीन निवासस्थानाचा त्यांचा हट्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त होऊनही स्वाधीन क्षत्रिय यांनी मंत्रालयासमोरचा आलिशान शासकीय बंगल्याचा ताबा सोडलेला नाही. याउलट सेवा अधिकाराच्या आयुक्तपदी वर्णी लागल्यानंतर ते सारंग या शासकीय इमारतीत दोन नवीन फ्लॅटची मागणी करत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली. स्वाधीन क्षत्रिय यांच्या वार्षिक विवरण पत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मालकीची दोन घरे मुंबई आणि नेरुळमध्ये आहेत. या घरांच्या भाड्यातून त्यांना 20 लाखांची वार्षिक मिळकत होते. मात्र, तरीही मुंबई-ठाण्यात मालकी हक्काची घरे असून काही आजी-माजी अधिकारी 2008 सालच्या जीआरचा दुरुपायोग करून अनधिकृतपणे शासकीय निवस्थानावर कब्जा करून बसतात. त्यामुळे आता राज्य सरकार अशा अधिकाऱ्यांवर काही पावले उचलणार का हे पाहणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)