स्वातंत्र्य “ति’च्या असण्याचं – मुक्ततेच्या नव्या वाटा !

YEAH, THEY REJECTED ME. मी माझ्या कॉलेज-कॉम्पिटीशन किंवा ऑफिस-इंटरव्हुव बद्दल नाही बोलते. मुलगी वर्षे पुण्यात एकटी राहते, फार स्वतंत्र विचारांची आहे आणि लग्नानंतरही तिला गोष्टी पटल्या नाहीत तर नांदणार नाही,असं हे अतिहुशार, तथाकथित “मुलाकडचे’ म्हणवणारे लोकं मुलीच्या घरातल्यांना न भेटता, मुलीशी समक्ष न बोलता नकार कळवतात. मला राग त्यांचा नाही आला पण दया वाटली त्यांच्या विचारांच्या गरिबीबाबत! नकार लग्ननावाच्या मार्केटमधला होता!

मुळात मुलगी स्वतंत्र झाली म्हणजे नक्की काय? तिला शिक्षणाचा हक्क मिळाला, ती स्वावलंबी झाली, समाजात तिचं एक वेगळं अस्तित्व निर्माण झालं. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून “ती’ घरातून बाहेर पडली, असं आपण नेहमी का लिहितो. कृपया, गैरसमज नसावा, मला “स्त्री-पुरुष समानता’ या विषयावर टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख आणि फक्त स्वप्न अशा बेगडी मुलायम अस्तरातून बाहेर येऊन काहीतरी वेगळं सांगायचंय-स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांचे अनुकरण आहे का? स्त्रीवादाच्या चौकटीही आपण पुरुषांच्या वर्तनातून, अपेक्षांतून, गरजांतून आणि विचारांतूनच का पाहतो?

लिपस्टिक अंडर माय बुरखा हा सिनेमा अलीकडेच मी पहिला. स्त्रीच्या लैंगिक जाणीवा, गरजा आणि त्यांचं तिनं केलेलं उघड प्रकटीकरण/तिची घुसमट हा विषय घेऊन बऱ्यापैकी थेट व्यक्त करणारे सिनेमे आपल्याकडे कमीच असतात. “सेक्‍स’ फक्त पुरुषांच्या डोक्‍यात नाचत असतो आणि बाईला सेक्‍सपेक्षा भावनिक जवळीकच अधिक गरजेची असते, स्त्रीने तिच्या लैंगिक गरजा उघड उघड सांगणं अजूनही आपल्या समाजाला फारसं रुचत नाही. हा सिनेमा वास्तववादी आहे, कलाकारांचे उत्तम अभिनय, विषय आणि आव्हानात्मक मांडणी! पाहताना मन विषण्ण होत असलं तरीही शेवट पटत नाही. चार महिलांची एक स्वतंत्र गोष्ट या सिनेमात भेटते. शेवटच्या सीनमध्ये त्या चौघीजणी एक सिगारेट शिलगवतात आणि त्याचे मस्त झुरके घेतात. त्या सिगारेटच्या धुरात प्रत्येकीच्या आयुष्यात घडलेल्या त्रासदायक घटना मागे सोडत, स्वतःशी असलेलं भांडण संपवून स्वतःपुरतं उत्तर शोधण्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करतात…. एखाद्या बंधनातून मुक्त होण्यासाठी हातात खरंच सिगारेट घ्यावी लागते का? कि दोन तकिला शॉट मारत, क्‍लबिंग करत सो कॉल्ड हायप्रोफाईल कपडे घातले म्हणजे मुक्ततेचं वारे अंगात भिनले असं म्हणायचं ! सिनेमांत-नाटकांत-पुस्तकांत कशी दिसते बंडखोर, स्वतंत्र, स्वयंपूर्ण, स्वमर्जीन जगणारी स्त्री! सिगारेटचे झुरके मारणारी, दारू पिणारी, बाइक चालवणारी, शरीरसंबंधात सैलसर वागणारी अशी स्त्री म्हणजेच “मुक्त’ हा सरसकट दृश्‍यसमज आता काळानुसार बदलायला नको का? भारतीय महिला संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली. “छोरोंसे क्‍या कम है’पासून “लेडी सचिन तेंडूलकर’पर्यंत अनेक लेबल्स अनेकांनी या मुलींना लावली. मैंदान गाजवणाऱ्या हरमनप्रीत कौरला आपण “हरमनप्रीत कौर’ म्हणून स्वीकारायला तयार नसतो. म्हणजे पुरुषांच्या पुढे एक पाऊल गेलो तरच स्त्रियांचं यश, अस्तित्व, कर्तृत्व सिध्द होतं का? आणि ते तसं नसेल तर ते यश नाही का? मग सारं अशाच फुटपट्टीवर मोजलं जाणार असेल तर त्याला स्त्रीवाद आणि स्त्रीमुक्ती म्हणता येईल का? मार्गारेट थॅचर-ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान. बायका तर्कशुध्द विचार करत नाहीत, त्या भावनाप्रधान असतात, बुद्धीनं निर्णय घेत नाहीत अशी बायकांबाबत विधानं करणाऱ्या लोकांसाठी मार्गारेट थॅचर म्हणजे सणसणीत चपराक आहे. एक स्वप्नाळू मुलगी ते देशासाठी कठोर निर्णय घेणारी पंतप्रधान हा प्रवास समर्थपणे पेलवणारी आयर्न लेडी! ICICI बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक(MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) रिटेल बॅंकिंग क्षेत्राला नवं वलय देण्यासाठी ओळखलं जाणार चंदा कोचर हे व्यक्तिमत्व असेल. मुक्ततेचे निकष शोधायचे असतील तर यांच्याशिवाय उत्तम उदाहरणं नाहीत. जगातल्या दुसऱ्या अन्न आणि शीतपेये उद्योगसमुह PEPSICOच्या सध्याच्या अध्यक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) आणि बिझनेस EXECUTIVE असलेल्या इंद्रा नुयी, समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती ही यातलीच काही नावं! घरातल्या आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या, सगळी नाती लीलया पेलणारी अष्टभुजा, तुमच्या-आमच्या घरातली सून, वहिनी, आई या सगळ्या स्वंतत्र स्त्रियाच आहेत.

“ति’ला क्रेडीट कार्डसाठी नवरा नकोय तर एक चांगला सोबती हवाय. सभ्य, उदात्त याहीपेक्षा एक विश्वासू सहचर तिला हवाय. नुसते घरात पैसे फेकले कि संपलं कर्तव्य असल्या भ्रमात असणाऱ्या नवरयांसाठी बायको ही बिचारी नाही, संसाराचे शिवधनुष्य पेलणारी, सगळ एकटीने निभावणारी रणरागिणी आहे. सणांची तयारी, मुलांचा अभ्यास, आजारपण, अगदी सहज बाजारात मारायची फेरी यातल्या सहवासातला, तिचा आनंद तिला हवाय! तुमच्या जाण्यानं तिला फरक नाही पडणार पण तिच्या नसण्यान तुमचं काय होईलयाचा विचार एकदा नक्की कराच.

भाग्यश्री आनंद सकुंडे (कृष्णा), पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)