स्वातंत्र्याबाबत समाज अद्याप किशोरवयीन अवस्थेत

  • डॉ. नवनाथ तुपे : “इंद्रायणी’मध्ये बहि:शाल शिक्षण केंद्राचे उद्‌घाटन

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – आपल्या समाजाला स्वातंत्र्याचे व्यवस्थित आकलन झालेले नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये खऱ्या अर्थाने समाजात रुजली गेलेली नाहीत. आपला समाज स्वातंत्र्याबाबत अद्याप किशोरवयीन अवस्थेत आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:शाल शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. नवनाथ तुपे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बहि:शाल विभाग, ज्येष्ठ नागरीक सहायता कक्ष आणि इंद्रायणी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयामध्ये बहि:शाल शिक्षण केंद्राचे उद्‌घाटन डॉ. नवनाथ तुपे यांच्या हस्ते झाले. यानिमित्त “स्वातंत्र्याची जाणीव’ या विषयावर आयोजित शिबिरात डॉ. तुपे बोलत होते. शिबिराचे बीजभाषण फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश पवार यांनी केले. या वेळी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, डॉ. भौमिक देशमुख, प्राचार्य डी. डी. बाळसराफ, उपप्राचार्य डॉ. संभाजी मलघे, इंद्रायणी फार्मसी विभागाचे प्राचार्य बी. बी. जैन, प्रा. एस. एन. शिंदे, बहि:शाल केंद्र कार्यवाह डॉ. संदीप कांबळे, गुलाब शिंदे आदी उपस्थित होते.

-Ads-

डॉ. नवनाथ तुपे पुढे म्हणाले की, विद्यापीठाने इंद्रायणी महाविद्यालयाला सुवर्ण महोत्सवी वर्षात बहि:शाल शिक्षण केंद्र दिले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपयुक्‍त असे अनेक कार्यक्रम महाविद्यालयाने राबवावेत. माणसाला आपल्या कृतीची, जबाबदारीची आणि परिणामांची जाणीव असली पाहिजे. कृतीमागची कारणमीमांसा माहिती पाहिजे. स्वातंत्र्यानंतर इतक्‍या वर्षांनी आजदेखील समाजात जात-पात, धर्मभेद, लिंगभेद दिसून येत आहे, अशी खंतही डॉ. तुपे यांनी व्यक्‍त केली.

डॉ. प्रकाश पवार म्हणाले की, स्वातंत्र्यामुळेच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधला जातो. आज व्यक्‍तीस्वातंत्र्यावर गदा येताना दिसत आहे. स्वातंत्र्याचा आपल्याला विसर पडत चालला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेचे व्यवस्थित आकलन करून घेतले पाहिजे.

कृष्णराव भेगडे म्हणाले की, आज शासन शिक्षणाच्या बाबतीत उदासीन दिसत आहे. अनेक शाळा बंद करण्याचा निर्णय होऊ घातला आहे. कंपन्या किंवा मोठमोठ्या उद्योजकांच्या शिक्षणसंस्था येणार आहेत. याचा प्रचलित व निष्ठवान शिक्षण संस्थांवर मोठा विपरीत परिणाम होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी. डी. बाळसराफ यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी केले. उपप्राचार्य डॉ. एस. के. मलघे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)