स्वातंत्र्यसंग्रामातील अग्रणी नेताजी

कदम कदम बढाये जा
खुशी के गीत गाये जाये
ये जिंदगी है कौम की
तु कौम पे लुटाये जाये

आझाद हिंद फौजेचे हे गाणे म्हणत चलो दिल्ली नारा देत, भारतीय स्वातंत्र्यासाठी हजारो सैनिकांना एकत्र करून त्यांना राष्ट्राप्रती लढण्यासाठी प्रेरित करीत, देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे राष्ट्रतेज नेते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस होय. सुभाषचंद्र यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी जानकीनाथ आणि प्रभावती या दांपत्याच्या पोटी कटक येथे झाला

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्यावर जर कोणी अन्याय करीत असेल तर त्याचा आपण तात्काळ विरोध केला पाहिजे, ही यांची भूमिका कायम राहिली. ते प्रेसिडेन्सी महाविद्यालयात शिकत असताना प्रा.ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांना अपमानकारक वागणूक द्यायचे. सुभाष बाबूंना हे खूप खटकत असे. एकेदिवशी त्यांनी प्रा.ओटेन यांच्याविरुद्ध बंड केले. त्यामुळे त्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले. पुढे त्यांनी दुसऱ्या महाविद्यालयातून आपले शिक्षण चालू ठेवले. नेताजींनी आपल्या आयुष्यात असंख्य लोकांना आदर्शस्थानी ठेवून आपल्या देशकार्यास सुरूवात केली. त्यामध्ये स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि देशबंधू चित्तरंजन दास यांचा समावेश होतो.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वाट्टेल ते त्याग करण्याची तयारी ठेऊन स्वातंत्र्याच्या लढाईत ते उतरले. यासाठी त्यांना अनेकवेळा तुरूंगवास भोगावा लागला. नेताजींनी घेतलेली प्रत्येक भूमिका ही भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यास सहयोगी ठरणारी होती. शत्रूंचा शत्रू तो आपला मित्र म्हणून त्यांनी तत्कालीन स्थितीत हिटलर, मुसोलिनी आणि अशा असंख्य नेत्यांच्या भेटी घेतल्या. आझाद हिंद फौजेच्या माध्यमातून त्यांनी हजारो भारतीय युद्धकैद्यांना आपल्या लढ्यात सामील करून घेतले. त्यांना तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दुंगा म्हणत स्वातंत्र्य मिळवण्याचा विश्‍वास दिला. झाशीची राणी पलटण तयार करून त्यांनी या लढाईत महिलांनाही सहभागी करून घेतले. अंदमान आणि निकोबार ही बेटे इंग्रंजाकडून जिंकून त्यांचे शहीद व स्वराज असे नामकरण केले. तत्कालीन स्थितीमध्ये जगभरात असंख्य घटना एकाचवेळी घडत असताना नेताजी बाबू स्वतःची नावे आणि वेशभूषा बदलत भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा एकच विचार घेऊन जगभर फिरत होते. महात्मा गांधी आणि नेताजी बाबू यांच्यामध्ये काही वैचारिक मतभेद होते मात्र, गांधीजींबद्दल त्यांच्या मनात आदराची भावना होती. राष्ट्रनिष्ठा, स्वातंत्र्याची आकांक्षा, निर्मळ चरित्र, अपूर्व त्याग, निरागस सेवा आणि साहस या गुणांसह आजही नेताजीबाबूंची प्रेरणा भारतीयांमध्ये जिवंत आहे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करीत, जय हिंद हा राष्ट्रीय नारा त्यांनी दिला. स्वतंत्र भारत पाहण्यास आपल्यातील कोण असेल हे माहिती नाही मात्र, भारत इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होईल हे अधिक महत्वपूर्ण आहे असे म्हणणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन.

– श्रीकांत येरूळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)