#स्वातंत्र्यदिन विशेष: रवींद्रनाथांच्या नावे उर्दू अध्यासन कशासाठी? 

देवीदास देशपांडे 
बांगलादेश हा एक कट्टर भाषाप्रेमी देश म्हणून ओळखला जातो. ज्या देशाने उर्दूच्या दडपशाहीच्या विरोधात मोठी किंमत चुकवून स्वातंत्र्य मिळविले त्याच देशात, रवींद्रनाथ टागोरांसारख्या बंगाली कवीच्या नावाने, उर्दूचे अध्यासन सुरू करण्यासाठी खरोखर नोकरशाही अंगात भिनलेली असायला हवी. “एका अत्याचारी कालखंडाची आठवण करून देणारा आणखी एक अत्याचार,’ याशिवाय त्याला आणखी काही म्हणता येणार नाही. 
बांगलादेशाचा इतिहास भारताशी अविभाज्यपणे जोडलेला आहे. बांगला देशाच्या निर्मितीतही भारताचे सर्वाधिक योगदान होते. असे असताना त्याच भारताने बांगलादेशाची आगळीक करावी, याला काय म्हणावे? सांस्कृतिक संबंध सुधारण्यासाठी म्हणून भारत सरकारने अलीकडेच टाकलेले एक चुकीचे पाऊल वेळीच मागे घेतले नाही, तर त्याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले नुकतेच बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी केलेल्या एका करारानुसार, इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) या संस्थेने ढाका विद्यापीठात नवीन अध्यासन सुरू करण्याचे ठरविले आहे. आयसीसीआर ही संस्था परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारित येते. या संस्थेने ढाका विद्यापीठातील अध्यासनाला रवींद्रनाथ टागोर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. पण नेमके हे अध्यासन उर्दू भाषेच्या अभ्यासासाठी स्थापन करण्याची बुद्धी आयसीसीआरला झाली.
“रोबिन्द्रो चेअर फॉर उर्दू’ या नावाने हे अध्यासन ओळखण्यात येणार आहे. आता बांगलादेश आणि उर्दू या दोन गोष्टींचा संबंध ज्यांना माहिती आहे, त्यांनी अशी विळा-भोपळ्याची मोट घालायचा प्रयत्न कधीही केला नसता. टागोर आणि उर्दू यांची सांगड घालण्याचा विचार ज्या कोणाच्या मनात आला त्याला साष्टांग दंडवत केला पाहिजे. ही जी कोणी व्यक्‍ती असेल तिच्या दृष्टीने बांगलादेश हा मुस्लीम बहुसंख्य असलेला देश आणि मुस्लिमांची भाषा उर्दू. त्यामुळे तिथे काही करायचे असेल, तर उर्दूतच करायचे, अशी कल्पना कदाचित कोणाला सुचली असेल. पण अशा जोड्या कल्पनांत ठीक आहेत, वास्तवात नाही. मुस्लीम म्हणजे उर्दू समीकरण पाकिस्तानातही जुळत नाही, मग बाकीच्यांची काय कथा!
टागोर हे अंतर्बाह्य बंगाली कवी व तत्त्वचिंतक होते. त्यांच्या लिखाणामध्ये उर्दूचे अवाक्षरही नाही. बांगलादेशातील लोक टागोरांकडे अत्यंत आदराने पाहतात. त्यांचे(ही) राष्ट्रगीत टागोरांनीच लिहिले आहे. दोन देशांचे राष्ट्रगीत लिहिण्याचा मान मिळणारे ते जगातील एकमेव कवी आहेत आणि ही दोन्ही राष्ट्रगीते बंगाली भाषेत आहेत. शिवाय, पाकिस्तानी  सत्ताधीशांनी तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील लोकांवर अत्याचार केले, त्या अत्याचारांच्या विरोधाचे प्रतीकच मुळात रवींद्रनाथ टागोर हे होते. या विरोधातूनच तर बांगलादेशाचा उदय झाला.
ढाका विद्यापीठात (येथेच हे प्रस्तावित अध्यासन होणार आहे) 24 मार्च 1948 रोजी पदवीप्रदान समारंभात बॅ. महंमद अली जिना यांनी अत्यंत शिष्ट इंग्रजीत केलेल्या त्या भाषणात सांगितले होते की, पूर्व पाकिस्तानातील (म्हणजे आजच्या बांगलादेशातील) लोकांनी वाटेल ती भाषा वापरावी, परंतु राज्यकारभाराची भाषा पूर्वीचीच राहील. याला विरोध म्हणून पूर्व पाकिस्तानचे आरोग्यमंत्री मोहम्मद हबीबुल्लाह बहार यांनी ढाक्‍यात रवींद्रनाथांच्या जयंतीच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. रवींद्रनाथांची जयंती वास्तविक 8 मे रोजी होती; परंतु सत्ताधाऱ्यांना खिजविण्यासाठी ती मुद्दाम एप्रिलमध्ये आयोजित करण्यात आली होती. “डॉन’, “मॉर्निंग न्यूज’ यांसारख्या पश्‍चिम पाकिस्तानातील वृत्तपत्रांनी त्यावर कठोर टीका केली.
पाकिस्तानला बंगाली भाषेबाबत सदैव आकस होता. एक तर तिची लिपी उर्दूप्रमाणे पर्शियन लिपी नव्हती आणि दुसरे म्हणजे त्या भाषेतील साहित्य बहुतांशी हिंदूंनी लिहिलेले होते. बांगलादेशातील रवींद्रनाथांएवढेच मोठे कवी मानले जाणाऱ्या काझी नजरूल इस्लाम यांच्या लिखाणातही मोठ्या प्रमाणावर हिंदू प्रतीके आहेत. त्यामुळे बंगाली भाषा पश्‍चिम पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने, केवळ सांस्कृतिक नव्हे तर संरक्षणाच्या दृष्टीनेही धोका होती. त्यामुळे त्यांनी पूर्व पाकिस्तानावर उर्दू भाषा लादणे सुरू ठेवले.
याच्या परिणामी 21 फेब्रुवारी 1952 रोजी उर्दूच्या विरोधात प्रचंड निदर्शने उसळली. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सात जण मरण पावले. “भाषा शहीद’ या नावाने ते ओळखले जातात. आजही 21 फेब्रुवारी हा दिवस “अमर एकुश’ (अमर 21) या नावाने बांगलादेशच्या स्वातंत्र्यदिनाच्या (26 मार्च) बरोबरीने साजरा करण्यात येतो. मातृभाषेसाठी लढ्याचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा करण्यात यावा यासाठी बांगलादेशने आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने प्रयत्न केले. त्याच्याच परिणामी युनेस्कोने 21 फेब्रुवारी हा दिवस “आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस’ म्हणून अधिकृतरित्या जाहीर केला आहे.
“देशातील रेडिओवर रवींद्रनाथांची गाणी लावायची नाही, असा एक फतवा पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांनी जून 1967 मध्ये काढला होता. त्यावेळी पूर्व पाकिस्तानातील लेखक आणि कलावंतांनी “रवींद्र स्वाधिकार प्रतिष्ठा परिषद’ नावाची एक संस्था सुरू केली होती. शेख मुजिबूर रहमान यांनी 23 फेब्रुवारी 1969 रोजी ढाक्‍यात एक सभा घेतली. त्यावेळी त्यांनी गर्जना केली की, बंगाली लोक रवींद्रनाथांचे साहित्य वाचतील, त्यांची गाणी गातील आणि या भूमीत रवींद्र संगीतच वाजविण्यात येईल. प्रदीर्घकाळ कारावासात असताना कुराण आणि रवींद्रनाथांच्या “गीतावितान’ या पुस्तकांनी आपली संगत केली होती.’
पश्‍चिम पाकिस्तानातून वेगळा होऊन स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती होण्यामागे भाषेचा हा लढा मुख्यतः कारणीभूत आहे. अन्‌ अशा देशांमध्ये आपण रवींद्रनाथांच्या नावावर उर्दूचे संशोधन सुरू करू पाहात आहोत. तपन घोष हे पश्‍चिम बंगालातील भाजपचे नेते, पण त्यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. या वर्षी फेब्रुवारीत पाकिस्तानातील “नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ मॉडर्न लॅंग्वेजेस’ या विद्यापीठात डॉ. जुनैद अहमद या संशोधकाचा एक कार्यक्रम झाला होता. त्यावेळी अहमद म्हणाले होते की, पाकिस्तानने त्यावेळी ज्या चुका केल्या, त्याच चुका तो आजही करत आहे. उर्दू ही पाकिस्तानची भाषा कधीच नव्हती. सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तुनवा या प्रांतांचीही ती कधीच भाषा नव्हती. त्यामुळे बलुचिस्तान आणि फाटा प्रांतातील लोकांसाठी आपण विशेष लक्ष द्यायला पाहिजे.
पाकिस्तानला त्याच्या चुकांपासून काही कळत नसले तर ते आपल्या पथ्यावरच पडणार आहे. “जो माणूस चुकांतून शिकत नाही, तो मूर्ख असतो, जो स्वतःच्या चुकांतून शिकतो, तो सामान्य माणूस असतो आणि बुद्धिमान माणूस इतरांच्या चुकांपासून बोध घेतो’, असे इंग्रजीत एक वचन आहे. पाकिस्तानला यातून धडा घ्यायचा नसेल तर तो त्यांचा प्रश्‍न आहे. पण त्याच्यापासून आपण बोध घेतलाच पाहिजे आणि आपली चूक सुधारली पाहिजे. टागोरांच्या नावे सुरू होणारे उर्दू अध्यासन रद्द केले पाहिजे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)