स्वागत दीपपर्वाचे (अग्रलेख)

दिवाळी सुरू झाली आहे. नरकचतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून या दीपोत्सवाची रंगत वाढत जाईल. लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या तयारीची मोठीच लगबग घरोघरी सुरू आहे. रोजच्या दैनंदिन अडचणी विसरायला लावणारा हा दिव्यांचा उत्सव भारतीय संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा आहे. अडचणी, टंचाई, बिघडलेली आर्थिक गणितं, मंदावलेली उलाढाल, या साऱ्या समस्यांचा मुकाबला करणारा सामान्य माणूस या चार दिवसांच्या उत्सवात चार विरंगुळ्याचे क्षण आपल्या आप्तेष्टांच्या समवेत आनंदाने उपभोगत असतो. तशी यंदाची दिवाळी काही प्रमाणात सुखावह वाटत असली तरी पुढील वर्षात उद्‌भवणाऱ्या अनेक संकटांची चाहूल मात्र लोकांना या आधीच लागली असल्याने यंदाची दिवाळी तशी धास्तावलेल्या वातावरणातच साजरी करावी लागत आहे. सर्वात मोठे सावट आहे, ते दुष्काळाचे. पावसाळा नुकताच संपला असल्याने या दुष्काळाची धग लगेच इतक्‍यात गांभीर्याने जाणवत नसली तरी राज्यात यंदा केवळ 77 टक्केच पाऊस झाला असल्याने डिसेंबरनंतर मात्र सर्वांचीच त्रेधा उडणार आहे हे एव्हाना सर्वांच्याच लक्षात आले आहे.

राज्यातल्या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा कसा करायचा याच्या नियोजनाची धावपळ स्थानिक पातळ्यांवर सुरू आहे. धरणात साठलेल्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठीही सरकारी पातळ्यांवर लगबग सुरू आहे. पाण्याचा कोटा वाढवून मिळावा यासाठी न्यायालयाचे दरवाजेही आतापासूनच ठोठावायला सुरुवात झाली आहे. पुण्यात दिवाळीच्या चार-पाच दिवसांच्या काळात सुरळीत पाणीपुरवठा केला जाणार असला तरी दिवाळी संपली रे संपली की लगेच पुणेकरांनाही पाणी कपातीला तोंड द्यावे लागणार आहे. ग्रामीण भागातले दिवाळीनंतरचे चित्र तर याहूनही भीषण असणार आहे. वसुबारसेला सवत्स गायीची पूजा मनोभावे केली गेली, पण हेच पशुधन पुढील पावसाळ्यापर्यंत जगवण्यासाठी मात्र लोकांची कसोटी लागणार आहे.

दुष्काळाच्या समस्येचा सामना करण्यासाठी सरकार आपल्यापरीने कामाला लागले आहेच पण सगळेच सरकारकडून अपेक्षित करता येणार नसल्याने लोकांनाही आता स्वत:हून स्वत:चा मार्ग शोधावा लागणार आहे. देशाच्या एकूणच आर्थिक क्षेत्रातही पुढील दिवाळीपर्यंतचा काळ तरी कसोटीचाच असणार आहे. लोकांचा बॅंकांशी रोजच संबंध येतो. या बॅंकांची आर्थिक स्थिती खालावलेली असल्याने बॅंकांकडून बारीकसारीक सेवेसाठी शुल्क आकारणी सुरू झाली आहे. मिनीमम बॅलन्स मेंटेन करण्यासाठी सामान्यांना जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. अन्यथा त्यासाठीही दंड भरावा लागणार असल्याने खातेदारांना त्याचीही मोठी धास्ती असते. कर्ज पुरवठा करण्यावर बॅंकांना मर्यादा घालण्यात आल्या आहेत. ही झाली सामान्य माणसांची बॅंकांच्या संबंधातील स्थिती पण अतिउच्च पातळीवरही अब्जावधी रुपयांच्या कर्जबुडवेपणामुळे जवळपास सर्वच सरकारी बॅंका अडचणीत आल्या आहेत.

रोजच हजारो कोटी रुपयांची कर्ज बुडवून पळून गेलेल्यांची प्रकरणे उघडकीला येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर बॅंकांकडून जनसामान्यांनाच यापुढील काळात वेठीला धरणारी धोरणे अंमलात येण्याची शक्‍यता बळावली आहे. रोजगारनिर्मिती क्षेत्रातही अजून म्हणावी तशी गती येताना दिसत नाही. बहुतेक घरांमध्ये शिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या तयारीत असलेल्या युवकांचे अस्तित्व आहे. त्यांचे कसे होणार याची काळजी त्यांच्या पालकांना साहजिकच लागली असणार. स्वत:चा काही धंदा सुरू करावा अशी आज बाजाराची स्थिती नाही. त्यामुळे सरधोपट नोकरीचा मार्ग पत्करावा तर तशी संधीही उपलब्ध नाही. घरची शेती परवडेनाशी झाली आहे ही बहुतेक घरांतील स्थिती आहे. त्यामुळे निदान पुढील दिवाळीपर्यंत तरी घोर लावणाराच काळ आपल्यापुढे उभा ठाकला आहे, हे ध्यानात घेऊनच यंदाची दिवाळी साजरी करावी लागणार आहे.

दिवाळी आणि रेशनवर त्यानिमित्त खुला होणारा जीवनावश्‍यक वस्तूंचा जादाचा साठा याचे एक जिव्हाळ्याचे नाते पूर्वीच्या काळापासून जपले गेले होते. पण आता मध्यमवर्गीयांना रेशनची गरजच नाही असा समज करून घेतलेल्या सरकारी यंत्रणेने मध्यमवर्गींयांचे रेशनच जवळपास बंद केल्यासारखी स्थिती आहे. पण आता दिवसच असे येत आहेत की पुन्हा रेशनवरील धान्यासाठी रांगा लावण्याची वेळ मध्यमवर्गींवर येणार असल्याने रेशनिंगची व्यवस्था आता पुन्हा सुरळीत करण्याचे काम सरकारला करावे लागणार आहे. दिवाळी म्हटली की सधन वर्गात शेअरबाजारातील स्थिती आणि सोन्याच्या दराची आवर्जून चर्चा होते.

बऱ्याच पडझडीनंतर शेअरबाजार सध्या सावरताना दिसतो आहे आणि सोन्याच्या भावात वाढ झालेली दिसत असली तरी बऱ्याच अंशी नियंत्रित स्वरूपाची आहे. पुढच्या दिवाळीपर्यंतचा काळ हा देशातील निवडणुकीच्या धामधुमीचाही काळ असणार आहे. पुढील दिवाळी येईपर्यंत केंद्रातील निवडणुका पार पडलेल्या असतील. राजकारण्यांसाठी हा सुगीचा काळ असला तरी जनसामान्यांनी मात्र राजकीयदृष्ट्याही जागरूक राहण्याचा हा काळ आहे. आपल्याला काय फरक पडतो अशा मानसिकतेत आता जनसामान्यांना राहून चालणार नाही.

दिवाळी दरवर्षीच येते, पण ती भविष्याची चाहुल आणि गतकाळाचा आढावा घेऊन संसाराचेही नियोजन करण्याची एक संधी असते. त्यामुळेच हा आनंदाने साजरा करण्याचा सण असला तरी पुढच्या दिवाळीपर्यंतचे काही संकल्प निश्‍चित करण्यासाठीही हा महत्त्वाचा काळ आहे. आपण नेहमीच आशावादी वृत्ती ठेवतो आणि तशी ती ठेवायलाही हवी पण आता भान राखूनच साऱ्या बाबी आपल्याला पार पाडाव्या लागणार आहेत. या दीपपर्वांच्या सर्वांनाच मनापासून शुभेच्छा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)