स्वागत कक्षात स्वागतालाच कोणी नाही

जिल्हा परिषदेच्या कारभाराचा अजब नमुना

गोडोली, दि. 6 (प्रतिनिधी)
मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत ग्रामीण भागातील जनतेला सुविधा पुरवण्याचे काम केले जात असल्याने नागरिकांचा नेहमी राबता पहायला मिळतो. मात्र, साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या भव्य-दिव्य इमारतीत एखाद्या विभागात जायचे असेल तर ते नवख्या नागरिकाला कळणारच नाही. म्हणून स्वागत कक्ष सुरु करण्यात आला असला तरी या कक्षात “कोणीही यावे आणि टपली मारून जावे’ अशी परिस्थिती पहायला मिळते. त्यामुळे स्वागत कक्षाला वाली मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेची सूत्रे डॉ. कैलास शिंदे यांनी स्वीकारल्यानंतर प्रत्येक विभागात शिस्तीने काम सुरु झाले असले तरी विभाग प्रमुखांचा सावळा गोंधळ काही थांबलेला नाही. बांधकाम उत्तर व दक्षिणमध्ये कामांच्या वाटणीवरून सदस्यांपेक्षा अधिकाऱ्यांना जास्त रस असल्याचे अनेकदा समोर आले आहे. असाच प्रकार स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सुरु असून कागदीघोडे नाचवण्यात तरबेज असलेल्या अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही आपल्या कृत्यांचा थांगपत्ता कधी लागू दिला नाही. वैद्यकीय विभागात सरकारी बाबू नामधारी असून कंत्राटी कारभारी असल्याची परिस्थिती उघड असताना अद्याप डॉ. कैलास शिंदे यांनी रडारवर घेतले नसल्याने लवकरच या विभागातील कामचुकार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना जालीम औषध मिळणार अशा चर्चा मात्र रंगल्या आहेत.
शासनाच्या सुविधा वेळेत नागरिकांना देताना पारदर्शकपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी सक्रीय असलेल्या डॉ. कैलास शिंदे यांच्यापुढे छोटे-छोटे प्रश्न उपस्थित करणे योग्य नसल्याचे सांगत नागरिकांना माहीती देण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचे कारण देत जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्याने स्वागत कक्षात कोणी उपलब्ध नसल्याचा विषय दुर्लक्षित केला. मात्र, स्वागत कक्षात नेमणूक असणाऱ्या कर्मचाऱ्याला फुकटचा पगार का दिला जातो, हे विचारल्यावर तिथे रोटेशन पद्धतीने काम दिले जात असल्याचे सांगण्यात आले. खरेतर सर्वसामान्य माणसाला प्राधान्य देताना जिल्हा परिषद विभागांची माहीती देणारे तरी जागेवर असावेत, अशी धारणा असली तरी “अधिकारी तारी त्याला कोण मारी’ असा उपरट कारभार डॉ. शिंदे फैलावर घेणार का, असा सवाल निर्माण झाला आहे.

यशवंत विचारांचा वारसा सांगणारे सातारा जिल्हा परिषदेत कोणता विभाग नक्‍की काय काम करतो हे राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांना कळेनासे झाले आहे. स्वागत कक्षासह तब्बल सहा विभागात पुरेसे कर्मचारी नसताना झिरो पेंडन्सिच्या नुसत्याच गप्पा मारल्या जातात. प्रशासकीय शिस्तीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी प्रत्येक विभागाला आठवडी अहवाल सक्‍तीचा केला आहे. मात्र झारीतले काही शुक्राचार्य त्यातुनही पळवाट काढण्याच्या तयारीत असतात. पदाधिकाऱ्यांमध्ये टक्‍केवारीचा फुलणारा ‘वसंत’ सध्या पदाधिकांच्या वर्तुळात चर्चेचा विषय आहे. जि. प अध्यक्षांकडे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या कित्येक तक्रारी झाल्या, मात्र अद्याप राजेशाही कारवाई झालेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)