मृत रुग्णांची आकडेवारी देण्यास आरोग्य विभागाकडून टाळाटाळ

61 रुग्ण घेतायेत रुग्णालयात उपचा

पुणे – दिवसागणित स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून ती 140 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये 61 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, यातील किती अत्यावस्थ आहेत व किती जणांचा मृत्यू झाला, याची आकडेवारी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे.

स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या जुलै महिन्यापर्यंत केवळ 15 होती. मात्र, त्यानंतर ऑगस्ट महिन्यात साधारण पन्नास तर सप्टेंबर महिन्यात त्याहून अधिक रुग्णांची संख्या वाढली आहे. मुख्य म्हणजे पालिकेकडून प्रत्येक शाळेमध्ये स्वाईन फ्लूबाबत जनजागृती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात पालिकेतील शाळांच्या शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना याबाबत शाळांमध्ये माहिती देण्यास सांगितले. त्यामुळेच याची जेवढी जनजागृती होणे अपेक्षित होते त्या प्रमाणात ती झाली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच शहरात दिवसागणित आठ ते दहा रुग्ण आढळून येत आहेत.

आरोग्य विभागाकडून यापूर्वी अत्यावस्थ रुग्णांची संख्या देण्यात येत होती. मात्र, आता ती देणे बंद केले आहे. तसेच, एकूण रुग्णांची संख्या पाहता उपचारांती घरी सोडलेले व सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 21 चा फरक असून या 21 रुग्णांचे नेमके काय झाले याबाबत आरोग्य विभागाने अद्यापही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे लोक वेळीच सावध झाले नाहीत तर उत्सवकाळात रुग्णसंख्या वाढण्याची शक्‍यता डॉक्‍टरांनी वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)