स्वाईन फ्लू चा फैलाव अन्‌ पालिकेचा बनाव

स्वच्छ सर्वेक्षणाचा गोंधळ आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

सातारा – स्वच्छ सर्वेक्षण- मध्ये सातारा पालिकेच्या नामांकनात वाढ झाली आहे. शासनाने दिलेला एक कोटी निधी अखर्चित आहे. या संदर्भातल्या महत्वाच्या प्रश्‍नांवर चौकशी सुरु आहे. दोन महिने झाले तरी अद्याप चौकशी का संपली नाही आणि जिल्हा प्रशासान पालिकेच्या भ्रष्ट कारभाराला पाठिशी घालत आहे असा आरोप आता होऊ लागला आहे.

-Ads-

शासनाने दिलेला एक कोटी रुपयांचा निधी अखर्चित आहे. तो का खर्ची टाकला नाही? केलेल्या कामांची बिले काढली नसली तरी काही कामांची बिले कशी अदा केली? आणि काही प्रश्नांवर पालिकेची अप्पर जिल्हाधिकारी चौकशी करत असताना दोन महिने झाले तरी चौकशी कशी संपत नाही? असा सवाल उपस्थित होताना जिल्हा प्रशासन पालिकेच्या भ्रष्ट कारभाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप लोकांमधून होत आहे.

स्वच्छतेचा जागर करताना लोकांमध्ये जनजागृतीसाठी शासनाने गेल्या चार वर्षात किती निधी दिला आणि तो कसा खर्च केला, हे स्वच्छ सर्वेक्षणाची कामे पाहिल्यावर लक्षात येते. या कामांबाबत सातारा पालिकेने राबवलेली प्रक्रिया आणि केलेल्या प्रतापाची तक्रार अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली. मात्र जिल्हा प्रशासन दखल घेत नसल्याने थेट नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर आणि विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांच्याकडे केल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण- अंतर्गत केलेल्या कामांची अप्पर जिल्हाधिकारी यांना चौकशी पूर्ण करून ऑगस्ट पूर्वी अहवाल मागवला होता. मात्र, दोन महिने लोटले तरी जिल्हा प्रशासन चौकशीचा फार्स करत असल्याने सातारा पालिकेच्या अनागोंदी आणि भ्रष्ट कारभाराला जिल्हा प्रशासनाने अभय दिले का दुर्लक्ष केले जात आहे, असा सवाल सातारकरांमधून उपस्थित होत आहे.

आरोग्याचा प्रश्‍न गंभीर , अधिकारी निवांत
शहरात स्वाईन फिव्हर असून सातारकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न गेल्या दोन महिन्यांमध्ये निर्माण झाला असून पालिकेचा आरोग्य विभाग सुस्त असल्याने डीएचओ भगवान पवार यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, याचा सातारा पालिकेला काही फरक पडत नसल्याने अखेर जिल्हा शल्य चिकित्सकांसह स्वतः शहरातील स्वाईन पिडीत रुग्णांच्या नातेवाईकांना भेटू असे आश्वासन डॉ. पवार यांनी दिले. यावरून पालिकेचा आरोग्य विभाग किती बेजबाबदार झाला आहे, याचा प्रत्यय येतो.

वास्तविक नगराध्यक्षा माधवी कदम यांनी फिल्डवर उतरून साथीच्या आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या भेटी घेत दोषी अधिकाऱ्यांना रडारवर घेणे अपेक्षित असताना ते होत नाही. मल्हार पेठ गुरूवार पेठ, बुधवार नाका, कर्मवीर कॉलनी सदर बझार येथे तापाची साथ असताना पालिकेचा आरोग्य विभाग लक्ष देईनासा झाला आहे . वास्तव असले तरी स्वाईन फ्ल्यूच्या भितीमुळे सातारकरांची पुरती गाळण उडाली आहे. या परिस्थितीत सातारकरांना दिलासा द्यायला कोण धावणार? हा प्रश्न असला तरी निवडणुका तोंडावर असल्याने खासदार आणि आमदार या प्रश्नाकडे का दुर्लक्ष करतात, हे कोडेच आहे.

स्वच्छतेचा फुगा आकाशात
शासनाने दिलेला कोटीचा निधी अखर्चित ठेवल्याचे पालिकेतून सांगत असले तरी न केलेल्या कामांची लाखोंची बिले तातडीने काढली आहेत . यामध्ये बरेच काही काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त होत आहे . स्वच्छ सर्वेक्षणासाठी साताच्याच्या आकाशात सोडण्यात आलेला फुगा उडून गेला पण कोणालाच त्याचे देणे घेणे उरले नाही . तो फुगा नंतर अजिंक्‍यतारा किल्ल्यावर सापडला . त्यांच्या बिलाचा पण मोठा घोळ आहे . तो निस्तरण्यातच पालिकेचे श्रम आणि वेळ वाया चालला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)