मुंबई – स्वाईन फ्लू व डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी अभ्यास गटाची नेमणूक करण्यात येणार आहे. या अभ्यासगटाच्या माध्यमातून संशोधन व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानसभेत दिली.
राज्यभरात स्वाईन फ्लू आणि डेंग्युने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले यामध्ये 200 हून अधिक नागरीकांचा मृत्यू झाला असल्याबद्दल विधानसभेत हर्षवर्धन सकपाळ, अमिन पटेल, सुनिल शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
डास नियंत्रणासाठी एकात्मिक कीटक व्यवस्थापनाअंतर्गंत कीटक नाशके, अळीनाशकांचा वापर, गप्पी मासे, मच्छरदाण्या, अशा विविध उपाययोजना राबविण्यात येत असून मलेरियासाठी संवेदनशील भागात कीटकनाशक औषधाच्या दोन फेऱ्या दरवर्षी करण्यात येतात.
साथरोग निदान व उपचारासाठी सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये सुविधा उपलब्ध असून स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी, मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती, गरोदर माता आणि आरोग्य कर्मचारी यांना ऐच्छिक व मोफत लसीकरण सुरु करण्यात आले आहे. या लसीकरणाच्या माध्यमातून 1 लाख 28 हजार 26 व्यक्तींना लस देण्यात आली आहे, असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी डासोत्पत्ती रोखणे आवश्यक आहे याकरिता लोकसहभाग तसेच शालेय विद्यार्थी, पंचायतराज समिती सदस्य अशा अनेक समाज घटकांना प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच राज्यातील सर्व भागांमध्ये आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात येतो. मुंबई सारख्या शहरात डासोत्पत्ती नियंत्रण समित्या कार्यरत असून त्यांच्यामार्फत देखील जनतेचे प्रबोधन करण्यात येते, असे सावंत यांनी स्पष्ट केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा