स्वाईन फ्लूसाठी मृत्यू संशोधन समिती स्थापन होणार

प्रभात वृत्तसेवा

पुणे – शहरातील शासकीय तसेच खासगी रूग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या रू रूग्णांचा मृत्यू नेमका स्वाईन फ्लूनेच झाला की इतर आजाराने याची तपासणी करण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी महापालिकेस आदेश दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासाठी स्वतंत्र समिती न करता महापालिका स्तराव स्वतंत्र समिती करण्यात येणार आहे. ही पाच सदस्यिय समिती स्थापन करण्यास महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बुधवारी मान्यता दिली आहे. या समितीमध्ये महापालिकेच्या उप आरोग्यप्रमुखांसह, जिल्हा आरोग्य अधिकारी, ससूनचे अधिकारी तसे तज्ज्ञ डॉक्‍टरांचा समावेश असणार आहे. दरम्यान, या समितीने स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे शिक्कामोर्तब करे पर्यंत शहरातील या आजाराने झालेल्या मृतांची माहिती प्रसिध्दी माध्यमांना देऊ नये असे बंधन राज्याच्या आरोग्य विभागाने महापालिकेस घातले आहे. तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात जानेवारी ते जुलै 2017 अखेर तब्बल 100 जणांचा या आजाराने मृत्यू झाला असून या सर्व रूग्णांच्या मृत्यूचे नेमके कारण स्वाईन फ्लू आहे का याची तपासणी ही समिती करणार आहे.

मागील महिन्यात पुणे जिल्ह्यासाठी ही समिती स्थापन करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या होत्या. त्यानुसार, महापालिकेने ही समिती स्थापन करण्यापूर्वी पुणे जिल्ह्यात डेंगूच्या मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांच्या तपासणीसाठी समिती असतित्वात असून त्याच समितीच्या माध्यमातून स्वाईन फ्लूच्या रूग्णांच्या मृत्यूंचे संशोधन करावे अशी मागणी केली होती.मात्र, राज्यशासनाने त्यास नकार देत महापालिका स्तरावर स्वतंत्र समिती स्थापन करण्याच्या सूचना पालिकेस दिल्या होत्या. त्यानुसार, आरोग्य विभागाने हा समिती स्थापनेचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांसमोर ठेवला होता. त्यास आयुक्तांनी मान्यता दिलेली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

मृतांचा आकडा 100 च्या वर

राज्यशासनाने महापालिकेस स्वाईन फ्लूच्या रूग्णांच्या मृत्यूची माहिती प्रसिध्दी माध्यमांना देण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे पालिकेकडून केवळ शहरातील नवीन रूग्णांची आणि रूग्णालयात असलेल्या रूग्णांचीच माहिती दिली जात आहे.मात्र, राज्यशासनाच्या आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा पुणे शहरातील स्वाइन फ्लूच्या मृतांचा आकडा 100 च्या वर गेलेला आहे. तसेच या आजाराची लागन झालेले सुमारे 36 रूग्ण अत्यावस्थ असून त्यांच्यावर शहरातील वेगवेगळया रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)