स्वाईन फ्लूसदृश रुग्णास रुग्णवाहिकेत घेण्यास नकार

108 रुग्णवाहिकेतील प्रकार : कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी

वडूज – स्वाईन फ्लू सदृश आजार असलेल्या रुग्णाला बीव्हीजी कंपनीच्या 108 रुग्णवाहिकेत घेण्यास डॉक्‍टरांनी नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार वडूजमध्ये घडला. याबाबत संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी साथ रोग आजार संदर्भात रुग्णवाहिका व्यवस्थापन व आरोग्य विभागाकडून दाखवलेल्या निष्काळजीपणा व त्यामुळे झालेला नाहक मनस्तापाबद्दल याची सखोल चौकशी करून दोषीवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

-Ads-

याबाबत त्रिमली, ता. खटाव येथील संदीप विलास पवार यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, संदीप पवार यांच्या वडिलांना तीन दिवसांपूर्वी अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यांना औंध येथील रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वडूज येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला.

येथे आणल्यानंतर काही प्राथमिक चाचण्या केल्यानंतर वडिलांना स्वाईन प्लू सदृश्‍य आजाराची लक्षणे जाणवल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यासाठी वडूज ग्रामीण रुग्णालयाचा संदर्भ देण्यास सांगितला. ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर बीव्हीजी कंपनीच्या 108 क्रमांकाशी संपर्क साधला. त्यानंतर एक तासाने रुग्णवाहिका आली. मात्र आजाराबाबतची चिठ्ठी बघितल्यानंतर अशा प्रकारचे रुग्ण आम्ही घेत नाही, असे सांगत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यामध्ये एक तास वाया घालवण्याबरोबर रुग्णासही त्रास सहन करावा लागला.

त्यानंतर सातारा येथील खाजगी रुग्णवाहिका बोलवली. तोपर्यंत वडूज येथून खाजगी गाडीने रहिमतपूरपर्यंत रुग्ण नेला. तेथे साताराहून आलेल्या खाजगी रुग्णवाहिकेत रुग्णास घेऊन जात असताना खेड-शिवापूर येथे त्यास जास्त त्रास होऊ लागला. त्यामुळे तेथीलच खाजगी दवाखान्यात दाखल केले.

रुग्णवाहिका व आरोग्य विभागाच्या असहकार्यामुळे कुटुंबाचा वेळ वाया जाण्याबरोबर रुग्णाच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला. हजारो रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. आरोग्य विभाग साथ रोगांबद्दल जनजागृती करीत असताना रुग्णवाहिकेच्या व्यवस्थापनाने अनास्था दाखवल्याने नाहक त्रास सहन करावा लागला. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)