‘स्वाईन फ्लू’बाबत प्रभागनिहाय जागृती कार्यक्रम

वैद्यकीय विभागाची मोहीम : महापालिकेच्या डॉक्‍टरांचा सहभाग

पिंपरी – शहरात स्वाईन फ्लूचे उच्चाटन करण्यासाठी महापालिकेच्या आठ रुग्णालयांतील डॉक्‍टरांमार्फत स्वाईन फ्लू विषाणुंपासून दक्षता बाळगण्यासाठी प्रभागनिहाय जनजागृती करण्यात येणार आहे. बैठका घेऊन बचत गट, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक संघातील नागरिकांना एच1एन1 विषाणुंपासून सुरक्षितता बाळगण्यासाठी आवश्‍यक उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये चालू वर्षात 22 रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. तर, 172 रुग्ण हे महापालिकेच्या रुग्णालयांत स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक वैद्यकीय उपचार घेत आहेत. 2015 मध्ये 64 रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला होता. सध्या पावसाळा सुरू असल्याने एच1एन1 विषाणुंचा फैलाव शिघ्र गतीने होण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. त्यामुळे लहान मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना या विषाणुंपासून दूर ठेवण्यासाठी सुरक्षितता बाळगावी लागते. यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला जनजागृती करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. त्यानुसार वैद्यकीय विभागाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी महापालिकेच्या रुग्णालयांमार्फत प्रभागनिहाय जनजागृती करण्याचा कार्यक्रम आखला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमार्फत खासगी वैद्यकीय व्यवसायिकांच्या सभा घेण्यात येत आहेत. आरोग्य समिती व बचत गटांच्या बैठका घेऊन याबाबत माहिती दिली जात आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन स्वाईन फ्लूबाबत समुपदेशन करण्यात आले. शहरात महापालिकेमार्फत स्वाईन फ्लू विषाणुंपासून सुरक्षितता बाळगण्यासाठी सूचना असलेली माहितीपत्रके वाटप केली आहेत. नागरिकांना “बल्क एसएमएस’द्वारे माहिती दिली जाणार आहे. यापुढेही शहरात प्रमुख ठिकाणी 20 होर्डिंग्स लावण्यात येणार आहेत. पाच सिनेमागृहांमध्ये स्वाईन फ्लूविषयक क्‍लिप प्रदर्शित करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयांत समुपदेशन करण्यात येणार आहे. प्रभाग स्तरावर नगरसेवकांना सोबत घेऊन जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी प्रभागांत नागरिकांच्या सभा आयोजित करण्यात येणार आहेत. स्वाईन फ्लूविषयक दोन लाख माहितीपत्रके छापून वाटप करण्यात येणार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)