स्वसंवाद आणि आपण

नम्रता देसाई

मानवी भाव व भावना या जाणिवांच्या हिंदोळ्यावरील नाजूक अशी झुळूक आहेत. कारण भाव नेहमीच मानवाला स्वसंवाद साधण्यासाठी प्रवृत्त करत असतात. हे भाव नेमके काय व कसे होते हे समजून घेण्यासाठी आपण स्वसंवाद साधत असतो. आपण जो स्वसंवाद करतो तो भावनांच्या सहाय्याने पूर्ण होतो. म्हणजेच मला लहानशा वेळात कोणावर तरी फार टोकाचा राग येतो, पण तीच व्यक्ती तुम्ही काही बोलण्या आधी तुम्हाला एक छानशी दाद देते. आपल्याला आधी आलेला राग हा आपले भाव आहेत तर आपल्याला स्तुती किंवा दाद मिळाल्याने आपण सुखावतो ही भावना आहे.

एखादं फार जुनं घर असतं, पण आपल्याला ते घर आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलवतं. कधी आपण रिझतो तर मधूनच खूप आधी केव्हातरी कोणातरी अनोळखी व्यक्तीशी आपण अशाच एखाद्या घराजवळून जाताना हडतूड करून बोललेलो असतो. ते सगळं आठवतं आणि आपण स्वतःशीच बोलतो, काय..? आपण अस्सेबोललो त्या व्यक्तीला? केवढे चूकिचे शब्द आणि तीव्र भावनांचा तो ओघ होता! समजलंच नाही काय नेमकं घडलं ते. पण नेमका काय विषय ती व्यक्ती बोलत होती? कसं आहे ना आपलं; ज्या गोष्टीबाबत तीव्र नापसंती व्यक्त करत आपण चार गोष्टी सुनावल्या तो विषय अथवा घटना आठवत कशी नाही.’

खरंतर आपण तेव्हा कोणत्या गोष्टीवर प्रतिक्रिया दिली हे महत्त्वाचे नाहीये, आपण स्वसंवाद साधला नाही हे फार महत्त्वाचे आहे. आपण जेव्हा आपल्यालाच संपूर्ण नाही पण थोडंफार ओळखतो तेव्हाच हा संवाद घडला पाहिजे. कारण मी’ने माझ्याशी, माझ्याबाबत, माझ्या अगदी महत्त्वाच्या वाटणा-या सर्व कामांना काही वेळेसाठी बाजूला ठेवून काही क्षण दिले तरी स्वसंवाद साधणे शक्‍य असते. पण हा स्वसंवाद आपल्याला खूप मोलाचे धडे देतो.

आपल्या आईसोबत भांडण झालं आणि आई आपण वापरलेल्या अपशब्दांनी दुखावली तर बोलू नकोस माझ्याशी. परती सरक.’ असं म्हणून झटकते आणि आपण प्रश्न विचारतो की मी काय एवढं केलं की तुला इतकं वाईट वाटावं? एक तर छोटुकला प्रश्न केलाय.’
आई काही उत्तर देत नाही. आणि आपण तो विसंवाद का झाला ते आठवण्याचा प्रयत्न करत काही क्षण रिवाइंड करतो. आणि साधला जातो तो स्वसंवाद. मग ना आपण आईसोबत शब्द वाढवत नाही; ना आत्मक्‍लेश करून घेतो. दोघेजण आपापल्या कामात गढून जातो आणि त्यामध्येच कुठेतरी आपल्यामध्ये सुसंवाद घडतो.

आपण की नई अलीकडे सॉरी गं माझ चूकलं’ असं म्हणत स्वसंवाद साधायला खरंच विसरलोय. त्यामुळेच आपण आपल्यातील सहज घडून आलेला संवाद गरज नसताना ताणत आहोत असं सतत जाणवतं. थोडा विस्ताराने विचार करू या.

आधी बालपण ते शाळकरी वय यामध्ये सात वर्षांचं अंतर होतं. मूल घरी सात वर्ष आई, बाबा, आजे, पणजे आणि त्यांचा सगळा नातेवाईकांचा गोतावळा पाहत मोठी होत. आणि हळूहळू संवाद साधत आई नंतर बाबा, मग काका, मामा, आजी मधूनच नंबर लावायची तर कधी आजोबा आपल्या नात-नातीचे लाडके बनून जात. मग काकी, मामी, छोटूकली सगळी भावंडं, त्यात कितीतरी ताया, दादा यांची भाऊगर्दी असायची. गट्टी जमायची. मग त्या सगळ्यांच्या अभ्यासाच्या पुस्तकातील पाठांचा सराव पाहताना शिक्षण, अभ्यास, पुस्तकं आणि खूप सारी माहिती यांबद्दल अप्रुप असायचे. त्यामुळे माझा दादा, ताई कसे हुशार आहेत हे कळायला लागायचे की आपण लाड करून घेत साधासा शाळेचा गणवेश, पाटी व एखादी पाटीवर लिहायला चौकोनी किंवा गोल पण लांब बाबांच्या बोटां एवढी मोट्ठी पेन्सिल घेऊन शाळेत जायचो.

या सात वर्षात आपसुकच लाड, कौतुक आणि खूप शब्द आपल्याकडे साठल्याने आणि घरी राहून खूप खेळ, गप्पा, खोड्या आणि शिक्षा व मार मिळाल्याने मनाने तय्यार’ होऊन शाळेत दाखल व्हायचो.

आता ना आपण स्वसंवाद साधतो, ना भाव व भावनांची ओळख पुरेशी होईपर्यंत मुलांच्या सहवासात राहतो ना त्यासाठी वेळ राखून ठेवतो. आताच्या सॉरी ना गं’ या सांस्कृतिक संदर्भात आपण स्वसंवाद आणि आत्मसंवाद साधत नाही. त्यामुळे काय-काय हरवलंयते वाचू या पुढील लेखातून. तोपर्यंत या लेखातील बारकावे आणि मांडलेल्या सर्व मुद्‌द्‌यांवर स्वसंवाद नक्की साधा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)