स्वरा भास्करबाबत एक आक्षेपार्ह ट्‌विट करणे विवेक अग्निहोत्रीला महागात पडले आहे. या एका ट्‌विटमुळे त्याला त्याचे ट्‌विटर अकाउंटच गमवावे लागले आहे. स्वराने केलेल्या तक्रारीवरून ट्‌विटरनेच ही कारवाई केली आहे. ट्‌विटरने विवेक अग्निहोत्रीचे अकाउंटच ब्लॉक करून टाकले आहे.

खरे तर हे सगळे प्रकरण थेट स्वरा किंवा विवेक अग्निहोत्रीशी संबंधित नाही. केरळमध्ये एका बिशपवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या ननशी संबंधित आहे. केरळमधील आमदार पी.सी. जॉर्ज यांनी या ननवर बेताल टीका केली होती. त्यावरून सोशल मीडियावरून या जॉर्ज महाशयांवर खूप टीकाही झाली. महिलांबाबत अशी आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल स्वरा भास्करनेही जॉर्ज यांच्यावर टीका केली होती. जॉर्ज यांची टीका म्हणजे “अत्यंत लाजिरवाणी, बेशरम आणि हीन दर्जाची होती. भारतातील राजकीय आणि धार्मिक बाबतीतला हा गैरव्यवहारच आहे. याचा खरोखर निषेध व्हायला हवा.’ असे स्वराने तिच्या ट्‌विटमध्ये म्हटले होते.

तिच्या या ट्‌विटला विवेकने रिप्लाय केले आणि तेथूनच वादाला सुरुवात झाली. ननने केलेला बलात्काराचा हा आरोप म्हणजे “मी टू’ सारखे सोशल मीडियावरचे अभियानच झाले आहे, असे तो म्हणाला. त्यानंतर त्याने संबंधित ननबाबत आक्षेपार्ह भाषेत विधानही केले. त्याचे काहीही समर्थन केले जाऊ शकत नाही. खरे तर विवेकला या वादामध्ये पडण्याचे काहीच कारण नव्हते. त्याने उगाचच हा वाद ओढवून घेतला. या रिप्लायनंतर स्वरा भास्कर गप्प राहणे शक्‍यच नव्हते. तिने ट्‌विटरकडे या संबंधात रितसर तक्रार नोंदवली. महिलांबाबत हीन वक्‍तव्य केल्याचे हे प्रकरण ट्‌विटरनेही गांभीर्याने घेतले आणि विवेक अग्निहोत्रीचे अकाउंट तत्काळ बंद करून टाकले. ट्‌विटरने केलेल्या कारवाईबद्दल स्वराने ट्‌विटरचे आभारही मानले आहेत. काही काळानंतर विवेकचे अकाउंट अनलॉक झाल्याचे दिसते आहे. मात्र त्याचे ते वादग्रस्त ट्‌विट मात्र डिलीट केले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)