स्वराज यांचा राजसंन्यास (अग्रलेख) 

आगामी 2019 ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी जाहीर केला. मध्य प्रदेशात इंदूर येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या सुषमा यांनी आपल्या आरोग्याचे कारण देत ही घोषणा केली. “निवडणूक न लढण्याचा माझा विचार आहे. पण त्याबाबत पक्ष निर्णय घेईल’, असेही त्यांनी स्पष्ट केले असले तरी त्यांचा हा निर्णय पक्षासाठी निश्‍चितच धक्‍कादायक आहे. भाजपचे नेते त्यांना राजसंन्यास घेण्यासाठी परवानगी देतील न देतील हा नंतरचा विषय आहे. पण तरीही उत्तम वक्‍तृत्व, चांगली प्रतिमा आणि इतर सर्वच पक्षातील लोकांशी चांगले संबंध ठेवून सुसंस्कृत राजकारण करणारी सुषमा स्वराज यांच्यासारखी दुसरी महिला नेता भाजपला सापडायची नाही.

सुषमा स्वराज यांच्या या घोषणेचे विरोधी पक्षांनी राजकारण केले नसते, तरच नवल. सुषमा स्वराज या “स्मार्ट’ असून मध्य प्रदेशात भाजपाची स्थिती खराब असल्याने त्यांनी मैदान सोडून दिल्याची तिखट प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी दिली आहे. चिदंबरम यांनी सुषमा स्वराज यांच्या कामाचे कौतुकही केले असून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थनाही केली असली तरी त्यांच्या टीकेने योग्य संदेश पोहोचवण्याचे काम केले आहे. मध्य प्रदेशात भाजपची परिस्थिती चांगली आहे की वाईट हे पुढील महिन्यातील मतमोजणीनंतर स्पष्ट होईलच. पण एक गोष्ट मात्र निश्‍चित आहे की, सुषमा स्वराज यांच्या या निर्णयाचा फटका भाजपला बसणार आहे.

आपल्या धारदार वक्‍तृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या सुषमा स्वराज या भाजपाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपची बाजू प्रभावीपणे रेटण्याचे त्यांचे कसब भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यांमध्ये नाही. जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हा भाजपचा चेहरा असला तरी मोदी यांच्यानंतर एक फर्डा वक्‍ता म्हणून फक्‍त सुषमा स्वराज यांचेच नाव घेतले जाऊ शकते. वयाच्या 25 वर्षांपासून राजकारणात असलेल्या स्वराज यांनी प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवला आहे. हरियाणात सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतरही त्यांनी आपले अस्तित्व ठळकपणे दाखवून दिले होते. तसे दीर्घकाळ विरोधी बाकावर बसण्याचेच राजकारण करावे लागल्याने स्वराज यांना सर्वच विषयात गती आहे आणि विरोधी बाकावर असताना सरकारला अडचणीत आणण्याचे किंवा सत्ताधारी बाकावर असताना सरकारचे समर्थन करण्याचे काम त्यांनी सारख्याच प्रभावीपणे केले आहे.

वर्ष 2009 ते 2014 या कालावधीत लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यांनी आपल्या भाषणांनी सरकारला चांगलेच घायाळ केले होते. साहजिकच 2014 च्या सत्तांतरानंतर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी येणार हे गृहितच होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार हे ठरले असल्याने सुषमा स्वराज यांच्याकडे परराष्ट्र खात्याची जबाबदारी आली. पण मोदी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री या नात्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे कायम बोलले गेले. आजारपणामुळे काही काळ त्यांचे आपल्या कामाकडे दुर्लक्ष झाले तरी पुन्हा कामावर रुजू झाल्यांतर त्यांनी सारी कसर भरून काढली होती. देशातील पूर्णवेळ पहिल्या महिला विदेशमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंद झाला आहे. यापूर्वी इंदिरा गांधी यांच्याकडे काही काळासाठी ही जबाबदारी असली त्या प्रभारी विदेश मंत्री होत्या.

नरेंद्र मोदी आपल्या परदेश दौऱ्यासाठी प्रसिद्ध असले तरी त्यांनी अगदी क्वचितच आपल्यासोबत सुषमा स्वराज यांना दौऱ्यावर नेले होते. म्हणूनच त्यांच्यावर अन्याय झाल्याचे बोलले जाते. पण सुषमा स्वराज यांनी स्वतंत्रपणे जे परदेश दौरे केले तेही गाजवले. संयुक्‍त राष्ट्रांच्या आमसभेत भारताची बाजू मांडताना, पाकिस्तानवर टीका करताना त्यांनी जी भाषा वापरली होती तेवढी प्रभावी भाषा आतापर्यत एकाही परराष्ट्रमंत्र्याला वापरता आली नव्हती हे वास्तव आहे. मुख्य म्हणजे आपल्या मंत्रालयातील कामांवरून सोशल मीडियावर त्या खूप सक्रिय असतात. ट्‌विटरवरच्या जनतेच्या समस्यांची दखल घेऊन त्यांना मदत करण्यास त्या नेहमी पुढे असतात. परदेशात विविध कारणांनी अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्याचे काम असो किंवा परदेशातील भारतीयांविरोधात होणारा हिंसाचार असो; प्रत्येकवेळी सुषमा स्वराज यांनी भारतीयांना मदत केली आहे.

पाकिस्तानी तुरुंगात हेरगिरीच्या आरोपावरून खितपत पडलेल्या कुलभूषण जाधव याची त्याच्या कुटुंबीयांशी भेट घडवून देण्यासाठी सुषमा स्वराज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. एक मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी नेहमीच प्रभावी काम केले असले तरी आता भाजपला खरी उणीव त्यांच्या नेतृत्वाची जाणवणार आहे. कारण बेळारीत काही वर्षापूर्वी सोनिया गांधी यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी द्यावयाची हा विषय समोर आला होता तेव्हा सुषमा स्वराज यांचेच नाव प्राधान्याने समोर आले होते आणि त्यांनी ही निवडणूक चांगली लढली होती. आज लोकांना अपील होईल असा महिला चेहरा भाजपमध्ये दुसरा नाही. आठवायचे झाले तरी पटकन चेहरे आठवणार नाहीत. स्मृती इराणी आणि हेमा मालिनी यांच्यासाऱखेच अभिनयातून राजकारणाकडे वळणारे चेहरे भाजपकडे उरले आहेत. म्हणूनच भाजपला सुषमा स्वराज यांची उणीव जाणवणार आहे. सुषमा स्वराज यांचा हा राजसंन्यास रोखण्याचा प्रयत्न पक्षनेतृत्वाने केला, तर आश्‍चर्य वाटायला नको. कारण आगामी राजकारणात भाजपला सुषमा स्वराज यांच्यासाऱख्या तोफेची गरजच आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)