स्वरांगणातल्या किमयागार अंजली-नंदिनी गायकवाड

सारेगमप लिटील चॅम्प या स्पर्धेची अंतिम फेरी जयपूर येथे सुरू होती. या स्पर्धेला आणि त्यातील स्पर्धकांना मोठी लोकप्रियता मिळत होती. त्यामुळे या स्पर्धेच्या वेळेत देशभरातीलच नव्हे तर विदेशातील प्रेक्षकही दूरदर्शन संचासमोर खिळलेले असायचे. विशेषतः नगरकर. अर्थात त्याला कारणही तसेच होते. नगरची अंजली गायकवाड ही अवघ्या सात वर्षांची चिमुकली अंतिम फेरीत पोहोचली होती आणि आज ती कसे गाते याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा आणि जवळ येणारी निकालाची वेळ या साऱ्या प्रतीक्षा संपून मान्यवर अतिथींनी निकाल जाहीर करायला सुरुवात केली आणि सरतेशेवटी या स्पर्धेतील विजेतेपदाचा मुकुट अंजली गायकवाडच्या शिरावर स्थिर झाला. तसं अख्या नगर शहराचं वातावरण बदलून गेलं. अंजली गायकवाड सारेगमप लिटील चॅम्प स्पर्धेची विजेती ठरली. हा क्षण नगरकरांनी दिवाळीसारखा साजरा केला. फटाक्‍यांची आतषबाजी, अंजली आणि तिचे कुटुंबीय नगरला पोहोचल्यानंतर भव्य मिरवणूक काढून केलेलं जंगी स्वागत नगरकरांनी आपल्या डोळ्यात आणि मोबाइलमध्ये साठवून ठेवलं.

नगरच्या संगीत क्षेत्राबाबत सांगायचं झालं तर अत्यंत प्रयोगशीलतेने ते विकसित झालं. ज्या काळात आजच्यासारखी साधन सामुग्री नसतानाही मोठ्या गायकांची गायकी पुण्या-मुंबईत जाऊन ऐकायची, सुरावटींची टीपणं काढायची, ती अभ्यासून रियाज करायचा अशा परिस्थितीतून नगर शहर-जिल्ह्याची संगीत क्षेत्राची वाटचाल सुरू झाली. मात्र, आज संगीताचं उत्तम प्रशिक्षण देणाऱ्या, संगीताची जोपासना करणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. अंजली-नंदिनी गायकवाड भगिनींनी संगीतसम्राट ही स्पर्धा आणि अंजलीनं सारेगमप लिटील चॅम्प ही स्पर्धा जिंकून नगरच्या संगीत क्षेत्राच्या वाटचालीवर मानाचा शिरपेच चढविला आहे. अनेक विद्यार्थी अंगद गायकवाड यांच्याकडे संगीताचे धडे गिरवायला येतात. त्याचवेळी आजूबाजूला रंगणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अंजली-नंदिनीवर संगीताचे सुरांचे संस्कार नकळतपणे होतच होते. नंदिनी अवघ्या पाच वर्षांची असताना गायला लागली, तर अंजली त्याहीपेक्षा लवकर अगदी चौथ्याच वर्षी गाऊ लागली. या दोन्ही भगिनींची संगीतातील कारकीर्द अवघ्या तीन-चार वर्षांची मात्र एवढ्या अल्पकाळात त्यांनी अनेक स्पर्धा तर गाजवल्याच, शिवाय अनेक स्पर्धातून बक्षीसं मिळवली आणि आपल्या गायकीनं प्रेक्षक, श्रोते, परीक्षकांना थक्क करून सोडलं.. नव्हे या स्वरांगणातल्या अद्‌भूत सुरांच्या त्या किमयागार ठरल्या.

अगदी अल्लड वयातल्या या दोघी भगिनी. नंदिनी मृदू आवाजाची मात्र तिची स्मरणशक्ती, आकलनशक्ती तल्लख असल्याचे अंगद गायकवाड यांनी निरीक्षणातून हेरलं. एकूणच संगीतातील चांगली समज नंदिनीला आहे. शब्दातला नेमका भाव तिला कळतो हे जाणवलं.वयाच्या पाचव्या वर्षी नंदिनीने सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं “आकाश पांघरून जग शांत झोपले..’ ही काहीशी गंभीर रचना वडिलांना गाऊन दाखवली. त्यांनीही तीचं कौतुक करत तिच्या गाण्यावर थोडी मेहनत घेतली आणि त्यावर्षीच्या रावसाहेब पटवर्धन बालमहोत्सवात या गाण्याच्या सादरीकरणातून प्रेक्षकांची दाद तर मिळवलीच, शिवाय पुरस्कारही पटकावला.

अंजलीतर त्याहीपेक्षा लवकर गाऊ लागली. खणखणीत आवाज, त्यात चंचलता असे दुहेरी मिश्रण असल्याने तीही नंदिनीसारखं उत्तम गाऊ शकेल, असाही विश्‍वास अंगद गायकवाड यांना होता. त्या वयातच अंजली छोट्या छोट्या बंदिशी सहज गाऊ लागली. “तुम बिन मोरी कौन खबर ले, मोरे गिरिधारी..’ ही पारंपरिक चालीतली पिलू रागातली बंदिश अगदी बिनचूकपणे गात अनेक मैफिलीतून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवून कौतुकास पात्र ठरत असतानाच लातूरच्या अष्टविनायक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत “वृंदावनी वेणू..’ ही गवळण सादर करून त्या स्पर्धेत उपविजेती ठरली अर्थात वयात बसत नसल्याने तिचा विजेतेपणाचा मान हुकला. तिथेच तिचा सन्मान सुरेश वाडकरांच्या हस्ते करण्यात आला. त्या दोघींशी बोलण्याच्या ओघात तुमचे आवडते गायक कोण, असा प्रश्‍न आला.

त्यावेळी शास्त्रीय संगीतात किशोरी आमोणकर, कौशिक चक्रवर्ती, मालिनी राजूरकर, पद्मावती शाळीग्राम, व्यंकटेश कुमार, शोभा गुर्टू, नजाकत अली, सलामत अली ही नावं आली, तर सुगम संगीतात लता मंगेशकर, आशा भोसले, श्रेया घोशाल, अरजित सिंग अशी नावे या दोघींनी पटापट सांगितली. वास्तविक पाहता अंजली-नंदिनीच्या वयातल्याच काय तर त्यांच्याहून मोठ्या असलेल्या पिढ्यातील बहुतांश लोकांना यातली काही नावं माहितीही नसतील. वर उल्लेखलेल्या गायकांची गायकी व इतरही नवी-जुनी गाणी त्यांना आवडत असल्याने रेडिओ, मोबाइलमधून त्या ऐकत असतात, त्यातूनही गायकीतल्या हरकती, नजाकती लक्षात ठेऊन त्या रियाजातून गिरवल्या जातात.

स्थानिक, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमधील शेकडो पारितोषिके अंजली-नंदिनीच्या बावनकशी यशाची साक्ष देतात. त्यामुळेच चित्रवाहिन्यांवरच्या रियॅलिटी शोमधूनही या दोघी भगिनींना वाइल्ड कार्डमधून प्रवेश मिळाला हेही या दोघींचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या दोन्ही भगिनींनी देशभरातील होणाऱ्या स्पर्धांमधून आलटून पालटून बक्षिसे मिळवल्याचे दिसते. त्याचे एकच उदहरण द्यायचे तर लखनौ येथे होत असलेल्या लखनौ क्‍लासिक व्हॉइस ऑफ इंडियाच्या स्पर्धेची 2015 सालची विजेती नंदिनी ठरली, तर 2016 साली याच स्पर्धेच्या जेतेपदाचा मान अंजलीने पटकावला. संगीतसम्राट या स्पर्धेत दोघींना एकत्रितपणे गायनाची संधी असल्याने अंजली-नंदिनी या स्पर्धेत सहभागी झाल्या. तर, सारेगमप लिटील चॅम्पस या स्पर्धेतही दोघी सहभागी होणार होत्या.

मात्र, संयोजकांकडून त्या दोघींच्या गायनाचे महत्त्व लक्षात घेऊन एकाच कुटुंबातील दोन बहिणींमध्ये स्पर्धा करणे बरोबर नाही असा मुद्दा पुढे आणल्याने नंदिनीने या स्पर्धेबाहेर राहण्याचे ठरविले. मात्र, अंजलीच्या यशात नंदिनीचा वाटा हा अत्यंत मोलाचा आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून अंजली-नंदिनीची यशस्वी घोडदौड जोमाने सुरू आहे. यापुढील काळातही शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा त्या दोघींचा मानस आहे. अगदीच पोरसवदा वय असलेल्या अंजली-नंदिनी यांनी अगदी लहान वयात मिळवलेले यश हिमालयाएवढे उत्तुंग आहे. मात्र, अजूनही या मुलींचे पाय जमिनीवर आहेत. आजही अंजलीला मैत्रिणींसोबत खेळायला खूप आवडते. वेळ मिळाला की पोहायला जाण्याचा छंद ती जोपासते. तर, नंदिनीला अभ्यासात रुची असली तरी शास्त्रीय संगीतातच करिअर करायचे आहे. आजवरच्या त्यांच्या यशाकडे पाहता भविष्यातही त्या संगीत क्षितिजावर अखंडितपणे झगमगत राहतील यात शंका नाही.

आईचे मोठे योगदान..
अंजली-नंदिनीच्या या सांगीतिक वाटचालीमध्ये त्यांची आई मनीषा गायकवाड यांचे मोठे योगदान आहे. कधीकाळी भजने, हरिपाठ गाण्याइतपतच संबंध असलेल्या मनीषा यांना लग्नानंतर अंगद यांच्या संगीताचा परीसस्पर्श लाभला. मग त्यांनीही संगीताचे कित्ते गिरवत संगीतातल्या चार परीक्षा दिल्या. अंजली-नंदिनीच्या रियॅलिटी शो स्पर्धांच्या सहभागात त्याच या मुलींबरोबर सातत्याने असायच्या. स्पर्धेच्या परीक्षकांनी दिलेले गाणे यु-ट्यूबवर शोधायचे, ते अंजलीला ऐकवायचे, अंजली ते वडिलांना गाऊन दाखवायची. वडिलांनी सूचना दिल्याबरहुकूम मनीषा मुलींकडून तयारी करून घ्यायच्या.

लिटील चॅम्प स्पर्धेच्या वेळी तर अंजलीला मनीषाताई आणि नंदिनी या दोघींचे मार्गदर्शन मिळाले. संगीताच्या चार परीक्षा पास केल्यानंतरही आज मी उत्तम गाते असे नाही. मात्र, मुलींच्या गाण्यात त्या कुठे चुकतात हे नेमकेपणाने सांगण्याइतका आत्मविश्‍वास त्यांच्यात आला आहे. घरातून असलेले सांगीतिक वातावरण आणि दोन्ही मुलींची शास्त्रीय संगीताची झालेली पक्की बैठक यामुळेच अंजलीने अंतिम फेरीत “नजर जो तेरी लागी, मै दिवानी हो गई’, “छल्ला वल्ला’, “मै कोल्हापूर से आइ हू’ या तीनही गाण्यांबरोबर अगोदर गायलेल्या काही गीतांमधील हरकती नजाकतींमुळे पाकिस्तानातील संगीत क्षेत्रातील जाणकारांनी अंजलीला भरभरून दाद दिली.

अंजली मनस्वी कलाकार..
अंजलीचे वडील अंगद गायकवाड हे मूळ लातूरचे. 2008 साली अखिल भारतीय गांधर्व संगीत अलंकार परीक्षेत ते देशभरातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानिमित्त अरुण निगवेकरांच्या हस्ते त्यांचा सन्मानही झाला. नगरमधील सुदाम गडकर हे तबलावादक संगीत शिकण्यासाठी म्हणून दर पंधरवड्याला लातूरला जायचे. तेथेच सुदाम गडकर आणि अंगद गायकवाड हे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे. नगरच्या पेमराज गुगळे कनिष्ठ महाविद्यालयात संगीत शिक्षकाची जागा भरावयाची असल्याने सुदाम गडकरींनी अंगद गायकवाड यांच्याकडे विचारणा केली. संगीत शिक्षकाच्या नोकरीनिमित्ताने ते नगरला आले. नगरमध्येही त्यांनी संगीत शाळा सुरू केली. व्यावसायिक संगीत कलावंत व्हावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती. अंजली-नंदिनी गायला लागल्यापासून त्यांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले. स्वतःला जरी व्यावसायिक कलावंत होता आले नाही तरी अंजली-नंदिनीच्या यशामुळे मी खूप समाधानी आहे, असे ते म्हणतात.

अंजली-नंदिनीला रियॅलिटी शोमध्ये पाठविण्याबाबत अंगद गायकवाड यांच्या मनाची द्विधा मनस्थिती झाली होती. यापूर्वीच्या रियॅलिटी शोज्‌बद्दल त्यांचा व्यक्तिगत अनुभव फारसा चांगला नसल्याने आणि स्पर्धेतून मध्येच बाहेर पडताना मुलींच्या मनावर होणारा परिणाम, आदी गोष्टींचा विचार करून, शिवाय शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या अंजली-नंदिनीच्या गायकीची शिस्त बिघडेल अशा अनेक प्रश्‍नांनी त्यांना घेरलेले होते. सरगमप्रेमी मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचे संगीत क्षेत्रातील गुरू पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांना भेटून त्यांनी परवानगी दिल्यानंतरच या मुलींना रियॅलिटी शोमध्ये भाग घेण्यास उद्युक्त केले.

 

 

देविप्रसाद अय्यंगार
मुख्य वार्ताहर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)