स्वतंत्र महिला स्वच्छतागृहे फक्त बॅनरवरच

स्वच्छतागृहे प्रत्यक्षात कोठे आहेत?नागरिकांना पडला प्रश्‍न

गुरूनाथ जाधव 

सातारा, दि. 31 – सातारा शहरामध्ये स्वतंत्र महिला स्वच्छतागृहे, मुताऱ्या आहेत फक्त स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या जाहिरात फलकांवरच.प्रत्यक्षात कुठे आहेत असा केविलवाणा प्रश्न आज सातारकर नागरिकांना पडला आहे.प्रामुख्याने स्वच्छतागृह वापरणाऱ्या लोकांमध्ये किमान 33 टक्के महिला आहेत. हे प्रमाण लक्षात घेवून महिलांच्या स्वच्छतागृहांनाही पालिकेने प्राधान्य दिले पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे महिलांची स्वच्छतागृहे सुरक्षित असली पाहिजेत. तिथे मुबलक पाण्याची सुविधा आवश्‍यकच आहे. किमान 500 मि. अंतरावर महिला स्वच्छता गृहांची उपलब्धता असणे आवश्‍यक आहे.

सातारा शहरामध्ये एसटी स्टॅण्ड,राजवाडा परिसर सोडला तर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे, मुताऱ्याच उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. त्यामध्ये पुरूषांकरिता मुताऱ्यांची संख्या देखील अत्यल्प असल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रशासकीय इमारतीच्या बाजूला उभ्या असणाऱ्या टॅक्‍सी, वडापवाले चालकांना मुतारीच नसल्याने गैरसोय सहन करावी लागत आहे. पोवई नाका परिसरात ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. मात्र ते झाल्यानंतर या ठिकाणी पुरूष व महिलांकरिता स्वतंत्र स्वच्छता गृहे व मुताऱ्या बांधल्यास काही प्रमाणातील नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

सातारा नगरपरिषदेच्यावतीने नागरिकांना माहिती देणारे जाहिरात फलक शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, शाळा, एसटी स्टॅण्ड, व गर्दीच्या परिसरात लावण्यात आले आहेत. त्यावर सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छ शौचालये, मुताऱ्या उपलब्ध आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत आमचे शहर अधिक स्वच्छ आहे. सार्वजनिक ठिकाणी पुरेशा प्रमाणात कचरा कुंडया आहेत. स्वच्छता कर्मचारी, ओला व सुका कचरा वेगळा देण्यास सांगतात. आमच्या शहरात वर्गीकृत कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले जाते. आमचे शहर हागणदारीमुक्त आहे अशी जाहीरात केली जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2019 सुरू झाले, आम्हाला माहित आहे. असे फक्त सांगण्यापेक्षा नागरिकांच्या आरोग्याची व स्वच्छतेची हमी स्विकारणे आवश्‍यक आहे. सातारा नगरपरिषदेला या कामी नागरिकांच्या सहकार्याची देखील अपेक्षा आहे. यामध्ये सातारा नगरपरिषदेने कृतीशिल पावले उचलल्यास स्वच्छ सातारा सुंदर सातारा होण्यास मदतच होणार आहे. त्यानुसार मिळणारे गुणांकन आपल्या शहराच्या स्वच्छतेचे प्रतिबिंब ठरेल असा विश्वास वाटतो. मात्र फक्त जाहिरातींच्या फलकांवर किंवा लावण्यात आलेल्या गॅसच्या फुग्यांपुरतेच सर्वेक्षण दिखावू ठरू नये असे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अनेक महिला कोर्ट, हॉस्पिटल, बाजार नोकरी, व्यवसाय, खरेदी, बॅंक, पोस्ट, सरकारी कार्यालयांतील कामांसाठी बाहेर पडतात. शहराच्या विविध भागात वेगवेगळ्या कारणांनी महिलांचा सतत वावर असतो. किंबहुना पुरुषांइतक्‍याच संख्येने महिला रस्त्यावर असतात.त्यांच्यासाठी शहरात सुयोग्य ठिकाणी स्वच्छतागृहाची सोयच नसल्यामुळे अनेक महिला बाहेर पडल्यानंतर पाणी पीत नाहीत. त्यामुळे शरीरासाठी आवश्‍यक असलेल्या पाण्याची कमतरता राहिल्याने अनेक शारीरिक आजार उद्भवतात.

सातारा शहरात तसेच न.पा.शाळा इमारतीमधील सार्वजनिक शौचालयांची संख्या 1093 आहे. वैयक्तिक शौचालय योजनेअंतर्गत सातारा शहरातील 900 लाभार्थ्यांना शौचालये बांधण्यासाठी प्रत्येकी 12000 रूपये दिले आहेत. यात दोन टप्यात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले आसल्याची माहिती सातारा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)