ब्राह्मण समाज महाराष्ट्रची मागणी
पुणे – ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, ब्राह्मण पुरोहितांना दरमहा पाच हजार मानधन द्यावे आणि दादोजी कोंडदेव व राम गणेश गडकरी यांचा पुतळा सन्मानाने बसविण्यात यावा, या इतर मागण्या आज समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्रतर्फे करण्यात आल्या.
विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच पुण्यात झाली. यामध्ये समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्र समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. या समितीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. या मागण्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच मार्गी लावाव्यात अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी विश्वजित देशपांडे,भरतबुवा रामदासी, आनंद दवे, सुरेश मुळे, अनिल मुळे उपस्थित होते.
“ब्राह्मण समाजातील आर्थिक मागास घटकातील तरुणांना शैक्षणिक व व्यावसायिक, तसेच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी 500 कोटींच्या तरतुदींसह स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. ब्राह्मण समाज, ब्राह्मण महापुरुषांवर होणारी बदनामी रोखण्यासाठी महापुरुष बदनामी विरोधी कायदा करण्यात यावा, ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह स्थापन करावे, के.जी ते पी.जी शिक्षण मोफत करावे मागण्या मांडण्यात आल्याचे देशपांडे आणि दवे यांनी सांगितले. समाज रस्त्यावर येवून आंदोलन करत नाही, म्हणून मागणीकडे दुर्लक्ष करू नये, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
“राज्याच्या लोकसंख्येत दोन ते अडीच टक्के ब्राह्मण असल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात राज्यात बहुभाषिक ब्राह्मणांची संख्या 80 ते 90 लाखांच्या आसपास आहे. सुमारे 12 लोकसभा मतदारसंघात 15 टक्के किंवा त्याहून अधिक संख्या आहे, तर राज्यातील 22 हजार खेड्यांमध्ये ब्राह्मण समाजाचे एकही घर नाही,’ अशी माहिती देशपांडे यांनी दिली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा