स्वच्छ सर्वेक्षणात मलकापूरचा नामोल्लेखही नाही

हणमंतराव जाधव यांची टीका
कराड, दि. 27 (प्रतिनिधी) – मलकापूरची 24 बाय 7 नळपाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा दर्जा, योजनेसाठी येणारा खर्च व पाण्यासाठी नागरिकांना मोजावी लागणारी किंमत पाहिली तर ही योजना दर्जाहीनच असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे वरील सर्व बाबी खेदजनक व लाजिरवाण्या आहेत. स्पर्धेत बक्षीस मिळवण्याच्या पदाधिकाऱ्यांनी फक्त बढायाच मारल्या. परंतु केंद्र शासनाने पुरस्कार जाहीर केल्यानंतर तेलही गेले…अन तूपही गेले…अशी स्थिती मलकापूर नगरपंचायतीची झाली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते हणमंतराव जाधव यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
या पत्रकावर भाजपचे शहराध्यक्ष सुरज शेवाळे, युवा मोर्चाचे तानाजी देशमुख, सुर्यकांत खिलारे, अरुण यादव, सुधाकर शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. हणमंतराव जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या स्पर्धेमध्ये मलकापूर नगरपंचायतीचे स्थान कोठेच नाही. नगरपंचायतीचा सत्ताधाऱ्यांनी स्वच्छ सर्वेक्षणाचा केवळ डंका पिटला. मात्र या स्पर्धेत नगरपंचायतीच्या हाती काहीच लागले नाही. प्रत्यक्षात पेपरबाजी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सत्तेच्या धुंदीपुढे लोकांच्या सामाजिक समस्या दिसून येत नव्हत्या. त्यामुळे जनतेची फसवणूक झाली असून जनता त्यांना कधीही माफ करणार नाही.
मलकापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील मुख्य रस्ते जरी बरे असले तरी त्यांचे काम दर्जाहीन झाले असल्याचे दिसून येत आहे. अंतर्गत रस्ते नगरपंचायतीने केलेलेच नाहीत. या अभियानात नगरपंचायतीने फक्त सहभाग नोंदवला. त्यावर अवाढव्य खर्च करून मोठा गाजावाजाही केला. मात्र स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान स्पर्धेच्या निकालात मलकापूर शहराचा नामोल्लेख कोठेही झालेला दिसत नाही.
शासनाने या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ठ स्वच्छ शहर, उत्कृष्ठ, नाविन्यपूर्ण, नागरिकांचा प्रतिसाद, गतिमान, मध्यम व लहान शहर हे पुरस्कार शासनाचे जाहीर केले होते. त्यामध्ये क्रमांक मिळवण्यासाठी मलकापूर नगरपंचायतीने पोष्टरबाजी, जाहिरातबाजी केली. मात्र पहिल्या पन्नास, शंभर, दीडशे स्वच्छ शहरांमध्ये कोठेही मलकापूर नगरपंचायतीचे नावही नाही. या स्पर्धेत मलकापूरला कोणताही पुरस्कार मिळालेला नसून स्पर्धेअंतर्गत कोणत्याही कार्याचा साधा उल्लेख देखील झालेला नाही. असेही पत्रकात म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)