‘स्वच्छ’ सर्वेक्षणात पालिकेकडून दुजाभाव

नागरिकांना दंड; शासकीय कार्यालयांना मात्र, नुसती समज

पुणे – “स्वच्छ’ सर्वेक्षणात पुणे शहर देशात अव्वल आणण्यासाठी अस्वच्छता पसरविणाऱ्या पुणेकरांकडून स्वच्छता तसेच दंडाची रक्‍कम वसूल करणाऱ्या महापालिका प्रशासनाने शासकीय कार्यालयांकडून केल्या जाणाऱ्या अस्वच्छतेबाबत केवळ समज देण्याची भूमिका घेत कारवाईत दुजाभाव केला जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, नजरेसमोर कचरा दिसत असूनही अतिरिक्त आयुक्तांपासून ते अभियानाच्या समन्वयकांपर्यंत सर्वांनीच चुप्पी साधल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेकडून केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरात पुण्याला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी शहरात नियमितपणे स्वच्छता सुरू असून अस्वच्छता पसरविणारे तसेच त्याला जबाबदार असणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत पालिकेने अस्वच्छता पसविणाऱ्या सुमारे 5 हजार जणांवर कारवाई केली आहे. हे अभियान आता अंतिम टप्प्यात असताना, महापालिका आयुक्त तसेच या अभियानाची मुख्य जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक तसेच या सर्वेक्षणाचे समंन्वयक माधव जगताप यांनी दुपारी 4 च्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात भेट दिली. यावेळी या अधिकाऱ्यांनी एस.टी. महामंडळाचे पुणे स्टेशन बस स्थानक, पुणे रेल्वे स्टेशन या परिसराची पाहणी केली. यावेळी एसटी स्थानकाच्या परिसरात मोठा कचऱ्या ढीग आढळून आला; तर पुणे स्टेशन परिसरातही जागोजागी कचऱ्याचे ढीग होते. मात्र, त्यासाठी कोणालाच जबाबदार न धरता या अधिकाऱ्यांनी डेपो प्रमुखांची भेट घेऊन त्यांना कचरा होऊ नये म्हणून सूचना केल्या. तसेच पुणे स्टेशनलाही स्टेशनच्या अधिकाऱ्यांनाही सूचना देण्याची तसदी घेतली. मात्र, एक बाजूला पुणेकरांकडून दंड वसूल करताना अधिकाऱ्यांना सूट का? याचे कोणतेही उत्तर या अधिकाऱ्यांना देता आले नाही.

आयुक्तांच्या कारवाईचा विसर
काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी अशाच प्रकारे अचानक वडगावशेरी भागात सकाळी पाहणी केली होती. त्यावेळी त्यांना शाळेच्या आवारात कचरा जाळल्याचे दिसून आले. त्यानंतर आयुक्तांनी पालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापकांकडे चौकशी केली. त्यांनी शेजारील खासगी शाळेचा हा कचरा असल्याचे सांगितले. त्यानंतर आयुक्तांनी या दोन्ही मुख्याध्यापकांकडून प्रत्येकी 500 रुपयांचा दंड वसूल केला होता. मात्र, आयुक्तांनी केलेल्या या कारवाईचा विसर मंगळवारी या अधिकाऱ्यांना पडल्याचे दिसून आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)