“स्वच्छ भारत’ पॉईंटचा सभापतींनी केला पर्दाफाश

विल्हेवाट न करताच कचरा जात होता शहराबाहेर : पाचगणीत “झिरो वेस्ट’चा बोजवारा

पाचगणी – नगरपालिका हद्दीतील गोळा केलेला कचरा घेऊन कचरा डेपोतून 2 वाहने पाचगणीच्या पालिकेच्या विद्यमान आरोग्य सभापतींनीच अडवली. यामुळे स्वच्छ शहर म्हणून देशात डांगोरा पिटणाऱ्या पालिकेच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून पाचगणी पोलीस ठाण्यात ही वाहने ठेवण्यात आली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शुक्रवारी सायंकाळी पाचगणीचे आरोग्य सभापती पृथ्वीराज कासुर्डे दांडेघर नाक्‍यावर वॉकिंग साठी चालले होते. यावेळी त्यांना पाचगणीच्या ‘स्वच्छ भारत पॉईंट’ या कचरा डेपोवरून 2 वाहने येताना दिसली. वाहने जवळ येऊ लागताच कासुर्डे यांना वाहनातून दुर्गंधी येऊ लागली. दुर्गंधीमुळे कासुर्डे यांनी वाहने अडवली व वाहनचालकांकडे चौकशी केली. मात्र त्यांनी उडवाउडवीची दिली. कासुर्डे यांनी तातडीने मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्याकडे तक्रार केली. तसेच नगरसेवक विनोद बिरामणे, नारायण बिरामणे, विजय कांबळे, अनिल वन्ने, सौ. रेखा कांबळे, सौ. रेखा जानकर, सौ.निता कासुर्डे, सौ.हेमा गोळे यांनाही घटनास्थळी बोलावले.

पाचगणीत ‘झिरो वेस्ट’ असताना ही कचऱ्याने भरलेली वाहने कचरा पॉईंटवरून बाहेर कशी आलीत? कुठे चाललीत? विल्हेवाट शहराबाहेर नेऊन तर लावली जात नाही ना? या वाहनातील कचऱ्याचे विलगीकरणं केले गेले आहे का? असे अनेक प्रश्‍न कासुर्डे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे मांडले. यानंतर मुख्याधिकारी 2 तासानंतर घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी घटनेची पूर्ण माहिती घेतली.परंतु, आरोग्य सभापतींच्या तक्रारींकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून मुख्याधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला. अन! उलट आरोग्य सभापतींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल करण्याची मागणी केली.

या वाहनात नक्की दडलंय काय? याचा शोध घेण्यासाठी कासुर्डे व सहकाऱ्यांनी दोन्ही वाहने पाचगणी पोलीस ठाण्यात नेली.
घटनेनंतर तातडीने चक्रे गतिमान होऊ लागली. कचरा उचलणे, वाहतुक करणे आदीचे ठेकेदार सुनील सनबे देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले. ठेकेदार आणि कासुर्डे व सहकारी या दोन्ही बाजूकडून पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्याची चर्चा सुरू झाली. कचऱ्याच्या वाहतुकीत काहीतरी गौडबंगाल आहे, त्याचा शोध लावा असा पवित्रा कासुर्डे समर्थकांनी घेतला. तर सरकारी कामात अडथळा असा सूर सनबे यांनी आळवला. यावर सपोनि तृप्ती सोनावणे यांनी मध्यस्थी करीत उद्या सकाळी सनबे यांची ‘वर्कऑर्डर’ बघून तक्रार दाखल करण्याबाबत निर्णय घेऊ असा मार्ग काढीत विषय पुढे नेला.

शुक्रवारी सकाळपासूनच कासुर्डे यांचे सहकारी नगरसेवक पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. पाचगणी पोलिसांनी हा विषयाच्या चेंडू पालिकेच्या कोर्टात टाकून दोन्ही वाहने पाचगणी पालिकेच्या ताब्यात दिली. यानंतर मुख्याधिकारी आरोग्य निरीक्षक स्वच्छता निरीक्षक यांनी वाहनातील कचऱ्याचा पंचनामा करणार आहेत. पंचनाम्यानंतरच या गाडीत दडलंय काय हे बाहेर येणार आहे. दरम्यान, ठेकेदारावर कचरा विनापरवाना अन्य ठिकाणी घेऊन जात असल्याप्रकरणी कारवाई करावी, अन्यथा सर्व जनआंदोलन छेडण्याचा इशारा सर्व नगरसेवकांनी दिला आहे.

केवळ हिटलरशाही

आरोग्य विभागाकडील संबंधित अधिकारी यांच्या देखरेखेखाली व सूचनेनुसार कचरा वर्गवारी करून न्यायचा असून प्रत्येक वस्तूची नोंदवही ठेवणे आवश्‍यक आहे. त्यावर आरोग्य विभागाकडील कर्मचारी यांच्या सह्य घेणे बंधनकारक असताना संबंधित ठेकेदार यातील कुठल्याही नियमांचे पालन न करता बेफिकिरपणे काम करीत आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष आहे. यावरून पांचगणी पालिकेत आरोग्य सभापती हे पूर्णपणे नामधारी असल्याचे दिसून येत आहे. शहरात केवळ हिटलरशाही चालू असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

रात्रीस खेळ चाले…

पाचगणी पालिकेच्या कचरा डेपोचा खेळ रात्री सुरू असून रात्री-अपरात्री कचरा डेपोवरून वाहने कचरा घेऊन परगावात विल्हेवाट लावत आहेत. या वाहनांची मस्टरमध्ये नोंद होत नाही. स्वच्छता अधिकाऱ्यांना कसलीही माहिती असत नाही, असा आरोप नारायण बिरामने यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)