“स्वच्छ’ जनजागृतीसाठी खासगी एजन्सी

पिंपरी – स्वच्छ भारत अभियान 2019 अंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता महापालिकेने दोन खासगी एजन्सी नेमल्या आहेत. घरोघरी जाऊन नागरिकांना सर्व्हेक्षणाची माहिती देणे, सुमारे अडीच लाख नागरिकांच्या मोबाईलवर ऍप डाऊनलोड करणे, शाळा व महाविद्यालयात पत्रके वाटणे व चर्चासत्र आयोजित करणे आदी कामे एजन्सींच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. त्यावर 44 लाख रूपये खर्च येणार आहे.

जनजागृतीसंदर्भातील कामे गेली तीन वर्षे महापालिकेने केली आहेत. यंदा पहिल्यांदाच हे काम खासगी एजन्सीमार्फत करून घेतले जाणार आहे. नागरिकांच्या घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे मार्गदर्शन करून स्वच्छ सर्व्हेक्षणाची माहिती दिली जाणार आहे. शहरातील किमान 2 लाख 50 हजार कुटूंबांना ही माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी प्रति कुटूंबाकरिता एजन्सीला 5 रूपये अदा केले जाणार आहेत.

नागरिकांच्या घरोघरी जाऊन केंद्र सरकारने विकसित केलेले स्वच्छता ऍप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून तक्रार नोंद करणे, फीडबॅक व वोटअप करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गृहसंस्थांमध्ये स्वच्छ मंच पोर्टलवर स्वयंसेवक म्हणून नोंदणी करून घेण्याचे काम एजन्सीला करावे लागणार आहे. किमान 2 लाख 50 हजार नागरिकांच्या मोबाईलमध्ये हे ऍप डाऊनलोड करण्याची अट आहे. त्यासाठी प्रत्येक मोबाईल धारकांमागे 10 रूपये शुल्क महापालिका एजन्सीला देणार आहे.

शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था व मंडळांकडे माहिती पत्रके वाटणे, चर्चासत्र घडविणे, जनजागृती व प्रशिक्षण आयोजित करणे. त्याचा अहवाल, छायाचित्र व सीडी सादर करण्याचे काम एजन्सीला करावे लागणार आहे. एका क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रत्येकी 20 प्रमाणे एकूण 160 जनजागृती अभियान घ्यावे लागणार आहेत. प्रत्येक अभियानाला 6 हजार रूपये महापालिका देणार आहे. त्यासाठी लघुमुदतीची निविदा काढण्यात आली.

ठेकेदारांमध्ये कामाची विभागणी
तीन महिने कालावधीतील या जनजागृती अभियानासाठी एकूण 47 लाख 10 हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार, चार निविदाधारकांच्या निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी नाशिक येथील हायटेक इलेक्‍शन मल्टी सर्व्हिसेस ऍण्ड कंपनीचे 43 लाख 46 हजार हे लघुत्तम दर प्राप्त झाले. त्यानंतर हायटेक सर्व्हिसेस यांनी आणखी 16 हजार 120 रूपये कमी करून 43 लाख 29 हजार 880 रूपये दर सादर केला. जनजागृतीचे हे काम तातडीचे असल्याने निविदेतील प्रथम आणि द्वितीय लघुत्तम दर प्राप्त निविदाधारकांना हे काम 50 टक्के विभागून देण्याची उपसूचना स्थायी समितीने मंजूर केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)