स्वच्छ इंधनही ‘पेट’णार

“सीएनजी’, “पीएनजी’ महागल्याने फटका

पुणे – स्वच्छ इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या “सीएनजी’ आणि “पीएनजी’ महागणार आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डीझेल दरीवाढीने “पेटलेल्या’ सर्वसामान्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

नैसर्गिक वायूची किंमत डॉलरमध्ये असते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत आहे. त्याचा फटका “सीएनजी’ला बसत आहे. यातच दर सहा महिन्यांनी शासनाकडून नैसर्गिक वायुंचे दर ठरविले जातात. आता शासनाने या गॅसची किंमत वाढवल्याने पर्यायाने “सीएनजी’च्या तसेच घरगुती वापरासाठीचा पीएनजी महाग झाला आहे. यामुळे आजपासून शहरातील नागरिकांना सीएनजी तसेच “पीएनजी’ अतिरीक्त तीन रुपये देऊन खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे वाहनचालकांचे बजेट कोलमडले आहे.

पावणेदोन लाख वाहनांना फटका
शहरात वाहनधारकांना 52 रुपये किलोग्रॅमने “सीएनजी’ वितरीत केला जातो. आता तो 55 रुपये किलोने मिळणार आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा फटका बसणार आहे. “सीएनजी’वर चालणारी एकूण 1 लाख 80 हजारांपेक्षा जास्त वाहने शहरात आहेत. याच चारचाकी कारची संख्या सर्वाधिक आहे. यानंतर रिक्षा, पीएमपी बस आणि काही प्रमाणात दुचाकींचा समावेश आहे. तर, घरगुती वापराच्या गॅसधारकांची संख्या लाखाच्या घरात आहे. त्याचे भाव 26 रु. प्रति एससीएम अर्थात स्टॅन्डर्ड क्‍युबिक मीटर असे होते. तेदेखील 29 रु. एससीएम होत आहेत.

पीएमपी “गॅस’वर
डीझेल दरवाढीमुळे आर्थिक गणित कोलमडलेल्या पीएमपीलादेखील येत्या काही दिवसांत आता “सीएनजी’चा झटका बसणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात “सीएनजी’च्या बसेसची संख्या लक्षणीय आहे. दरम्यान, एकट्या सप्टेंबरमध्ये 6 रुपयांनी डीझेल वाढल्याने पीएमपीला फटका बसला असल्याने आता सीएनजीकडूनही येत्या काळात किंमत वाढवली जाऊ शकते. यामुळे पीएमपीचे गणित पूर्णत: कोलमडणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत आहे. तसेच, शासनाकडून पुरवण्यात येणारा गॅसही महागला आहे. या किंमती देशातील सर्व ठिकाणी वाढल्या आहेत. बुधवारपासून नवा दर लागू होईल.
– संतोष सोनटक्के, वाणिज्यिक प्रमुख, एमएनजीएल

डीझेलदरात सातत्याने वाढ होत असतानाच आता दुसरीकडे थोडे फायदेशीर असलेले सीएनजीही महागले आहे. शहरात सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यात रिक्षाचालकांची संख्या लक्षणीय असून त्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे.
– बाबा शिंदे, महाराष्ट्र राज्य माल प्रवासी वाहतूक संघटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)