स्वच्छतेसाठी लोणावळ्यातील प्रवासी, वाहन चालकांना डस्टबीन वाटप

लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत “स्वच्छता ही सेवा’ या स्वच्छता अभियान प्रबोधन उपक्रमाअंतर्गत लोणावळ्यातील रिक्षा, टॅक्‍सी अन्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या संघटना व चालक, मालक यांना आपापल्या वाहनांमध्ये कचरा संकलनासाठी सुमारे साडेसातशे डस्टबिनचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

“स्वच्छ सर्वेक्षण 2018’मध्ये देशात सातवा व राज्यात पाचवा क्रमांक पटकाविणाऱ्या लोणावळा नगरपरिषदेने “स्वच्छ सर्वेक्षण 2019’मध्ये प्रथम क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्टसमोर ठेऊन वाटचाल सुरू केली आहे. हे उद्दिष्ट गाठण्याच्या अनुषंगाने स्वच्छते संदर्भात पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यासाठी लोणावळ्यातील विविध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये पर्यटकांचा कचरा संकलन करण्यासाठी वाहन चालक व मालकांना वाहनात ठेवता येईल.अशा प्रकारच्या साडेसातशे डस्टबिनचे मोफत वाटप नगरपरिषदेच्या माध्यमातून नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य समितीच्या सभापती बिंद्रा गणात्रा, पाणीपुरवठा समितीच्या सभापती पूजा गायकवाड व नगरसेवक राजू बच्चे यांचे या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले.

-Ads-

लोणावळा हे पर्यटन केंद्र असल्यामुळे सर्वच ऋतुमध्ये पर्यटनासाठी दररोज हजारो पर्यटक येत असतात. येणारे पर्यटक पर्यटना दरम्यान सोबत विविध खाद्यपदार्थ बाळगतात. खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर पर्यटक पदार्थांचे कागद, पिशव्या, झाकण, वेस्टन हे इतरत्र टाकतात. यामुळे सर्वत्र कचरा विखुरला जातो. पर्यटकांमुळे होणाऱ्या कचऱ्यावर अंकुश ठेवण्यासाठी लोणावळा नगरपालिकेने यावर्षी लोणावळ्यातील प्रवासी वाहनांमध्ये डस्टबिन ठेवण्याची नवीन संल्पना राबविली आहे. येणारे पर्यटक हे येथील स्थानिक प्रवासी वाहनात बसल्यावर त्यांच्या खाद्यपदार्थांचा कचरा हा संबंधित वाहनात ठेवलेल्या डस्टबिनमध्ये टाकेल. या संदर्भात पालिकेच्या वतीने प्रत्येक वाहनात सूचना व संदेश देणारे स्टिकर्स चिटकविण्यात आले आहे. तसेच प्रवासा दरम्यान कोणत्याही पर्यटकांनी इतरत्र आपला कचरा टाकू नये याची जनजागृती वाहन चालकाने करण्याच्या सूचना पालिकेच्या वतीने चालकांना देण्यात आल्या आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)