स्वच्छतेचे झाले; पण विद्रूपीकरणाचे काय ? 

शहरात जागो जागी असलेले बसथांबे, पदपथ, महावितरणचे फिडर पिलर, पथदिवे, झाडे, महापुरूषांच्या पुतळयांच्या भिंती अक्षरश: जाहीरातींनी विद्रूप करण्यात आलेल्या असून, शहरात रस्त्यावरून जातानाही हे विद्रूपीकरण सहज नजरेत भरते.

पेठा, उपनगरांमध्ये सार्वजनिक मालमत्ताचे बेसुमार विद्रूपीकरण


जाहीरातदारांची माहिती असतानाही पालिकेची कारवाईस टाळाटाळ


 

 

पुणे  : शहर अस्वच्छ करणाऱ्यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शहराची स्वच्छता राहणार असली, तरी शहरात जागो जागी असलेले बसथांबे, पदपथ, महावितरणचे फिडर पिलर, पथदिवे, झाडे, महापुरूषांच्या पुतळयांच्या भिंती अक्षरश: जाहीरातींनी विद्रूप करण्यात आलेल्या असून, शहरात रस्त्यावरून जातानाही हे विद्रूपीकरण सहज नजरेत भरते.

मात्र, शहर स्वच्छतेचा नारा देणाऱ्या महापालिकेकडून दिवसा ढवळया लावल्या जाणाऱ्या या जाहीरात बाजांवर त्यांची माहिती संबधित जाहीरातीवर उपलब्ध असूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. हे विद्रूपीकरण शहरात सर्वाधिक शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रभागतच आहे. तर उपनगरांमध्येही मोठया प्रमाणात अशा जाहीरातींचा सुळसुळाट आहे.

 जागा मिळेत तिथे जाहीराती
शहरात प्रामुख्याने मध्यवर्ती पेठांमध्ये अशा विद्रूपीकरणाने कहर केला आहे. नारायणपेठ, नवी पेठ, सदाशिव पेठ तसेच शुक्रवार पेठेसह, शिवाजी नगरच्या परिसरात स्पर्धा परिक्षा केंद्राची संख्या मोठी आहे. त्यामुळे या क्‍लास चालक, मेस चालक, हॉस्टेल मालकांकडून जागा मिळेल तिथे जाहीराती लावण्यात आल्या आहेत. त्यात पीएमपीचे बसथांबे, महापालिकेच्या स्वच्छता गृहांच्या भिंती, शाळांच्या भिंती, पथदिवे, रस्ता दुभाजक, झाडे, महावितरणचे फिडर पिलरवर या जाहीराती चिकटविण्यात आलेल्या आहेत.

एवढेच काय तर दुभाजकाला तसेच वाहतूक आयलंडला वाहने धडकू नयेत म्हणून दुभाजकावर रात्री चमकणारे रिफ्लेक्‍टर लावण्यात आलेले असून त्यावरही जाहीराती चिटकविण्यात आल्या आहेत. तर अनेक बस थांब्यावर वेळापत्रक आणि थांब्याच्या नावाची पाटी असते तिथेही जाहीराती चिटकविण्यात आलेल्या आहेत.

 

काढण्यासाठी मात्र लाखोंची उधळपट्टी
एका बाजूला महापालिकेकडून या जाहीरातबाजांना मोकाट सोडले जात असतानाच; दुसऱ्या बाजूला मात्र, त्यांनी लावलेल्या जाहीराती काढण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक तीन महिन्याला लाखो रूपयांच्या निविदा काढल्या जात आहे. त्यानंतरही हे काम अशा प्रकारे केले जाते की जाहीराती अधी बऱ्या दिसत होत्या. त्यातच या कामासाठी काही करावे लागत नसल्याने जाहीराती काढण्याच्या नावाखाली लाखो रूपयांचा मलिदा लाटला जात असल्याचे वास्तव आहे.

महापालिकेची हाताची घडी
शहर विद्रूपीकरण कायद्या अंतर्गत महापालिकेस अशा जाहीरातदारांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे तसेच दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्यातच; महापालिका सध्या शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करत आहे. त्यामुळे हे विद्रूपीकरण सुध्दा एक प्रकारे अस्वच्छताच आहे. मात्र, महापालिकेच्या अधिकारी आणि संबधित विभागांकडून त्याकडे डोळेझाक केली जात आहे. विशेष म्हणजे या जाहीरातींवर जाहीरात लावणाऱ्या कंपनीचे नाव तसेच पत्ताही आहे. त्यामुळे संबधित व्यक्तीवर सहज कारवाई करणे शक्‍य आहे. मात्र, त्या जाहीरातदारांना फोन करून त्यांच्याकडून चिरीमीरी घेऊन त्यांना राजरोसपणे जाहीराती लावण्याची मुभा महापालिकाच देत असल्याचे या वरून स्पष्ट होत आहे.

शहराला नुकताच देशातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहर म्हणून ओळख मिळाली आहे. अशा स्थितीत शहराचे हे विद्रूपीकरण योग्य नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने अशा जाहीरातदारांवर कारवाई करावी यासाठी सूचना देण्यात येतील तसेच या कारवाईस टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.- श्रीनाथ भिमाले (सभागृह नेते)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)