स्वच्छतेचा जागर…

केंद्र सरकारच्या वतीने स्वछता अभियान जोरकसपणे राबविण्यात येते, ग्रामिण भागात शौचालय, स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने किंबहुना ती वापरायची सवय नसल्याने अस्वच्छतेचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. अक्षयकुमारचा ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपट नावाप्रमाणेच शौचालय याच विषयावर बेतलेला आहे.

ही कथा गावात राहणाऱ्या केशव (अक्षयकुमार) भोवती फिरणारी. केशवला मंगळ असतो, यामुळे त्याचे लग्न म्हशीसोबत लावण्यात आलेले आहे. म्हशीसोबत लग्न झाल्यानंतर रेल्वे प्रवासात जया (भूमी पेडणेकर) हिच्याशी त्याची भेट होते. केशवला पहिल्या नजरेत जयाशी प्रेम होते. पुढे केशव-जयाचे लग्न होते, यानंतर जया केशवच्या घरी राहायला येते, तेव्हा केशवच्या घरी टॉयलेट नाही असे तीला समजते. यावरून जयाला खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो, केशव आपल्या पत्नीला टॉयलेटसाठी कधी दुसऱ्याच्या घरी, तर कधी रेल्वे स्टेशनवर आलेल्या रेल्वेच्या टॉयलेटमध्ये टॉयलेटसाठी घेऊन जातो. य सर्व गोष्टींना वैतागुन जया माहेरी निघुन जाते. पुढे काय होणार हे जाणुन घेण्यासाठी सिनेमा बघायला हवा.

दिग्दर्शक श्री नारायण सिंग यांनी चित्रपटाची मांडणी उत्तम केली आहे. समाजातील वास्तवतेचा विपर्यास होणार नाही याची काळजी कथेत घेण्यात आली आहे. पटकथेची मांडणी अचूक झाली आहे. चित्रपटातील संवाद चांगले आहेत, खळखळून हसवण्यासोबतच विचार करण्यास भाग पाडणारे आहेत. याशिवाय महिला आणि पुरुषांच्या विचारसरणीवर आणि सांस्कृतिक सभ्यतेवरही भाष्य करण्यात आलेले आहे. महिलांना येणाऱ्या अडचणी, आरोग्याच्या समस्या आणि त्यातून होणाऱ्या अत्याचारांनाही यामध्ये स्पर्श करण्यात आला आहे.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर अभिनेता अक्षयकुमार आणि भुमी पेडणेकर ही पहिल्यांदाच एकत्र आलेली जोडी, त्यांची ऑनस्क्रिन केमेस्ट्री जुळल्याने रसिकांना ही कथा खिळवुन ठेवते. भुमीचा हा दुसरा चित्रपट आहे, या मध्येही ती कोणत्याही ग्लॅमरविना रसिकांसमोर आली आहे. अभिनेता अक्षय कुमार याने पुन्हा आपण अभिनयात खिलाडी असल्याचे दाखवुन दिले आहे. अनुमप खेर, सुधिर पांडे आणि इतर सहकलारांचा अभिनय उत्तम झाला आहे.
सिनेमाचे चित्रीकरण ग्रामिण भागात झाल्याने कथेला अनुरूप वातावरण निर्मिती झाली आहे. चित्रपटातील गाणी कथेला पुढे घेऊन जातात, संगीत कथेला साजेसे आहे. एकंदरीत सांगायचे तर ग्रामिण भागार्तील शौचालयाची समश्‍या मांडणारा हा सिनेमा रसिकांच्या पसंतीत उतरेल अशी अपेक्षा ठेवायला वाव आहे.

चित्रपट – टॉयलेट-एक प्रेम कथा
निर्मिती – अरुणा भाटिया, शीतल भाटिया
दिग्दर्शक – श्री नारायण सिंह
संगीत – विकी प्रसाद, मानस-शिखर
कलाकार – अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, अनुपम खेर, सना खान
रेटींग – 2.5
– भूपाल पंडित
pbhupal358@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)